‘त्यांच्या’ अंगणी पक्षी गातात गाणी!

संजय जगताप
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मायणी - दुर्मिळ होऊ लागलेला चिमण्या-पाखरांचा चिवचिवाट, किलबिलाट पुन्हा बहरावा, धकाधकीच्या दैनंदिन जीवनात थकल्या जिवांना क्षणभर विरंगुळा मिळावा, यासाठी येथील पक्षीप्रेमी दादासाहेब कचरे धडपड करीत आहेत. पक्षांना अखंड धान्य-पाणी देत त्यांच्या निवाऱ्यासाठीही अनुकूल वातावरण निर्माण करीत आहेत. तेथील घरट्यांमध्ये जन्मलेल्या चिमुकल्यांनीच तर त्यांना पक्ष्यांचा अधिक लळा लावला आहे.

येथील भारतमाता शिक्षक कॉलनीतील दादासाहेब कचरे हे अनेक वर्षांपासून पक्ष्यांच्या संर्वधनासाठी उपक्रम राबवीत आहेत. राहत्या घराजवळ त्यांनी विविध वृक्षांची लागवड केली आहे. तेथे विविध जातीचे पक्षी येतात. त्यांना धान्य-पाणी मिळावे, यासाठी अंगणात ते पक्ष्यांसाठी धान्य विस्कटतात.

पाण्याची सोयही त्यांनी ठिकठिकाणी केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना धान्य-पाणी मिळत नाही. विशेषतः त्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. पक्ष्यांना पाणी मिळावे, यासाठी त्यांनी झाडांच्या बुंध्यात ठिकठिकाणी मडकी ठेवलीत. त्यामुळे पक्ष्यांनाही पाणी मिळते. झाडांनाही गारवा मिळतो. मडक्‍यांतून झिरपणारे पाणीही वाया जात नसल्याचे कचरे सांगतात. पाण्याच्या सोयींमुळे परिसरात पक्ष्यांचा वावर वाढला आहे.

चिमणी वर्गातील काही पक्ष्यांनी तर त्या मडक्‍यांचा घरटे, निवारा म्हणूनच वापर करण्यास सुरवात केली आहे. पक्ष्यांनी अंगणातील झाडांवर ठिकठिकाणी गवत काड्यांची छोटी- छोटी घरटीही बनवली आहेत. घरटे समजून मडक्‍यांमध्ये पक्षी अंडी घालत आहेत. ती उबवून पिल्लेही झाली आहेत. लहान मोठ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने कचरेंचे अंगण व परिसर चैतन्यमय होत आहे. चिमणी पाखरांच्या अनेक जाती नामशेष होऊ लागल्या असताना कचरे यांच्या पक्षीप्रेमाचा आदर्श निश्‍चितच पर्यावरण संतुलनासाठी पोषक ठरेल.

वेळच्या वेळी धान्य व पाणी मिळत असल्याने दहा ते १२ दिवसांतच पिलांच्या पंखात बळ येत असल्याचे व पिलेही घरटी सोडून जात आहेत. 
- दादासाहेब कचरे, पक्षीप्रेमी, सातारा

Web Title: Bird Sparrow Dadasaheb Kachare