कोरोनामुळे आरेवाडीत बिरोबा मंदिर आजपासून बंद 

दीपक सूर्यवंशी
Tuesday, 23 February 2021

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा मंदिर व मंदिराच्या परिसरातील सर्व दुकाने उद्या (ता. 23) पासून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतलेल्या पत्रकार बैठकीत जाहीर केले आहे. 

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा मंदिर व मंदिराच्या परिसरातील सर्व दुकाने उद्या (ता. 23) पासून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतलेल्या पत्रकार बैठकीत जाहीर केले आहे. 

राज्यभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढत चालला असल्याने राज्यभरात राज्य सरकारकडून अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव, मंदिर बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. आरेवाडी येथील मायाक्का देवीची यात्रा 1 मार्च ते 4 मार्च पर्यंत असते त्या अंनुषंगाने कवठेमहांकाळ येथे तहसीलदार बी. जे. गोरे, पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, तालुका वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मायाक्का यात्रा रद्द करण्यात येऊन, राज्य शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बिरोबा मंदिर व मंदिराच्या परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल, नारळवाले, कापुरभंडाऱ्यासह सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

त्यानुसार समोरून पडदा झाकून मंदिर बंद करण्यात आले आहे. व मंदिराच्या परिसरात येणारे सर्व रस्ते चारी पाडूण बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांनी बिरोबा बनात येऊ नये, आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर, माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, पोलिस पाटील रामचंद्र पाटील, सरपंच आबासाहेब साबळे, उपसरपंच बिरू कोळेकर, विलास ठोंबरे, गावकामगार तलाठी कल्पना आंबेकर, ग्रामसेवक आगतराव काळे, कोंडीबा कोळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biroba temple in Arewadi closed from today due to corona