‘बर्थ डे बॉईज’च्या धिंगाण्याने कऱ्हाडकरांच्या रात्री डिस्टर्ब

Birthday
Birthday

कऱ्हाड - मोठ्या साउंडवर लागलेली गाणी अन्‌ फटाक्‍यांची आतषबाजी मध्यरात्री वाजली, की समजायचे की, कोणाचा तरी वाढदिवस आहे. कॉमन होऊ पाहणाऱ्या या प्रवृत्तीला आता मध्यरात्री दुचाकीवरील धूमस्टाइलच्या धिंगाण्याची जोड मिळाली आहे. वाढदिवसाचे वाढते फॅड नागरिकांना त्रस्त करीत आहे. बर्थ डे बॉईजचा रात्रीचा दुचाकीवरून धिंगाणा, ठोकलेल्या आरोळ्या, अन्‌ रस्त्यात टेबल मांडून साजरा होणारा बर्थ डे लोकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे फ्लेक्‍स लावून वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रवृत्ती आता रस्त्यावर केक कापण्यासह दुचाकीवरून आरोळ्या ठोकत सामान्यांच्या रात्रीही डिस्टर्ब करू लागल्या आहेत. त्यावर लगाम घालण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. 

वाढदिवसाचे फ्लेक्‍स कॉमन होत असतानाच वाढदिवसाच्या नावाखाली शहरातील चौकाचौकांत सजणारे केक कापण्यासह साउंड सिस्टिमवरील विद्रुपीकरण सामाजिक स्वास्थ्यालाच आव्हान देणारे ठरते आहे. अशा प्रवृत्तींवर थेट कारवाई होण्याची गरज आहे. तालुक्‍यात मध्यंतरी तशा कारवाया झाल्या. मात्र, शहरात अद्यापही एकही कारवाई झालेली नाही. कारवाई न करण्यासाठी होणारा हस्तक्षेपही अत्यंत गंभीर आहे. बर्थ डे बॉईजवर कारवाई झाल्यास सामान्य लोक स्वागत करताना दिसतात, तर राजकीय लोक मात्र कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असतात.

मध्यंतरी पालिकेच्या विशेष सभेतही त्यावर चर्चा झाली. वास्तिवक ती चर्चा वाढदिवसाच्या फ्लेक्‍सवर होती. मात्र, मुद्दा बर्थ डेचाच होता. दादा, नाना, बाबा, काका, सरकार, सावकार अन्‌ भाई सारख्यांचे फ्लेक्‍सवर कारवाईची मागणी झाली खरी, मात्र त्यामुळे बर्थ डेच्या नावाखाली होणारा धिंगाणाही आता चर्चेत येताना दिसतो आहे. अशांवर कोणाचेच नियंत्रण नाही, अशी स्थिती आहे. पोलिसही केवळ कारवाईचा इशारा देतात, त्यामुळे तोही प्रयत्न असफल ठरत आहे. राजकीय हस्तक्षेप अशा प्रवृत्तीला बळ देत असला, तरी त्याला न जुमानता पोलिसांनी कारवाई केल्यास वचक निर्माण होऊ शकतो, अशी सामान्यांची भावना आहे. मलकापूरसह वारुंजी, मुंढे, गोटे, खोडशीसारख्या गावांत वाढदिवस साजरे होत आहेत. सैदापूर, बनवडी, ओगलेवाडीसह करवडी भागात त्याचे फॅड जोरात आहे. कॅनॉलवरही मध्यंतरी रात्रीच्या बारानंतरचा धुमाकूळ घालत वाढदिवस साजरा झाला. तेथे नेहमी पोलिसांची नाकाबंदी असूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असावे. शहरात रात्री फटाक्‍यांची आतषबाजी सुरू झाली, की कोणीतरी वाढदिवस साजरा करतो, असे समजायचे. मग लोकांची झोपमोड झाली तरी चालेल, मात्र या बर्थ डे बॉईजचा रात्रीचा धिंगाणा सहनच करावा लागतोय.

...याकडे होतंय दुर्लक्ष 
 सुसाट बर्थ डे बॉईजवर नियंत्रणचा अभाव
 कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव
 मध्यरात्रीनंतर मोठाले साउंड लावणे
 फटाका फोडण्यासह भरचौकात केक कापणे
 जोरजोरात आरोळ्या ठोकून दुचाकीवरून शहरात फिरणे 
 विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कारवाईच्या आदेशाकडे दुर्लक्ष 

जबाबदारी कोणाची 
एका वाढदिवसाचे चारशे ते पाचशे फलक लागतात. मात्र, कोणतीही कारवाई करायची कोणी, हाच खरा प्रश्न असतो. मग सोयीस्कर उत्तरे शोधून पोलिस पालिकेवर व पालिका पोलिसांवर जबाबदारी झटकतात. विनापरवाना लावलेले फलकांमुळे पालिकेचे उत्पन्न बुडते, जाहिरात करही बुडतोच त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com