पाणीटंचाईने त्रस्त गृहिणीस झोनमधील अधिकाऱ्याचे उध्दट उत्तर

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

खुशाल सांगा असे उत्तर देताना संबंधित अधिकारी उपहासात्मक हसत होता, आपल्यावर काही कारवाई होईल याची किंचितही भीती त्याच्या बोलण्यावरून वाटत नव्हती, असे निरीक्षण या गृहिणीने नोंदविले. 

सोलापूर - आयुक्तांना खुशाल सांगा, काही फरक पडत नाही. कारण आम्ही कसेही वागलो तरी ते काहीच करत नाही, ते फक्त बोलतात.. करत काहीच नाहीत.. तुम्ही खुशाल त्यांच्याकडे आमची तक्रार करा.... हे उत्तर आहे महापालिकेच्या झोनमधील अधिकाऱ्याचे एका ज्येष्ठ गृहिणीला. यापूर्वीही अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र काहीच कारवाई न झाल्याने या सर्वांची भीती संपली आहे. त्याचेच हे परिणाम असल्याचे जाणवत आहे. 

विजापूर रस्ता भारती विद्यापीठ परिसरात गेल्या सात दिवसांपासून पाणी नाही. त्यामुळे या भागातील एका त्रस्त महिलेने झोन क्रमांक पाचमध्ये फोन केला. त्यावेळी त्या ठिकाणाहून या गृहिणीस असे उत्तर मिळाले. संतापाची गोष्ट अशी की, खुशाल सांगा असे उत्तर देताना संबंधित अधिकारी उपहासात्मक हसत होता, आपल्यावर काही कारवाई होईल याची किंचितही भीती त्याच्या बोलण्यावरून वाटत नव्हती, असे निरीक्षण या गृहिणीने नोंदविले. 

झोनमध्ये दाद मिळत नाही म्हटल्यावर या गृहिणीने सकाळ कार्यालयात 12 वाजून 22 मिनिटांनी संपर्क साधला व झालेली हकीकत सांगितली. त्यावेळी 
आयुक्तांच्या कानावर ही बाब घालण्यास त्या गृहिणीस सांगितले. महिलेने 2740300 या आयुक्त कार्यालयाच्या क्रमांकावर संपर्क साधला असता, साहेब व्हिजीटला गेले आहेत. चारनंतर फोन करा असे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे संतापलेल्या महिलेने, झोन अधिकारी असे वागत असतील तर त्यांचे प्रमुख कसे असतील, असा उलटा प्रश्न केला. त्यावेळी आम्ही बातमीच्या स्वरुपात तुमचे म्हणणे मांडू.

कारवाईचा अधिकार आम्हाला नाही. वरिष्ठ संवेदनशील असतील तर कारवाई करतील, पत नसलेल्यांच्या नादी लागून कामचुकारांवर कारवाई न करण्याची त्यांची भूमिका असेल तर सोलापुरात रहात असल्याचे परिणाम भोगावे लागतील, याची कल्पना त्यांना दिली. या पार्श्वभूमीवर या घटनेची आयुक्त कितपत गंभीर दखल घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण आतापर्यंत केवळ मोठमोठे इशारे पहायला मिळाले, ठोस कृती दिसली नाही.
त्यामुळे अतिशय पोटतिडकीने पाण्याची तक्रार करणाऱ्या या ज्येष्ठ गृहिणीला उपहासात्मक उत्तर देणाऱ्यावर आयुक्त कारवाई करणार की त्या अधिकाऱ्याचा आत्मविश्वास खरा ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The bitter answer to troubled Housewife due to water scarcity by the officer