विश्वासघात ः आमचा आणि शेतकऱ्यांचाही... भाजपवाल्यांचे सरकारविरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

नगरः ""भाजपचा विश्वासघात करून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची घोर निराशा करत शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला आहे. येत्या काळात जर कारभार सुधारला नाही, तर भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करील,'' असा इशारा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी आज दिला.

नगरः ""भाजपचा विश्वासघात करून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची घोर निराशा करत शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला आहे. येत्या काळात जर कारभार सुधारला नाही, तर भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करील,'' असा इशारा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी आज दिला.

 
शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, असे आरोप करत त्याच्या निषेधासाठी भाजपतर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

जिल्ह्यातही ठिकठिकाणी असे आंदोलन करण्यात आले. भाजपने राज्य पातळीवर हे आंदोलन सुरू केले आहे. 
या वेळी वसंत लोढा म्हणाले, ""महाविकास आघाडीच्या काळात कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्याने महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नगरमध्ये अत्याचार, खून यांसारख्या अप्रिय घटनांमध्ये वाढ झाली आहे.'' 

आंदोलनात उपमहापौर मालन ढोणे, सुरेखा विद्ये, गौतम दीक्षित, वसंत राठोड, पंकज जहागीरदार, अजय चितळे, किशोर बोरा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांनी तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत देण्याची घोषणा केली होती.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीककर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे.

दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत कर्जमाफी योजनेत कोणताच उल्लेख नाही. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घोर फसवणूक या सरकारने केली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP agitates against the government