कोल्हापूरविषयीच्या 'त्या' वाक्याशी सहमत नाही; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
Sunday, 27 October 2019

इतकं करूनही कोल्हापूरकरांनी भाजप-शिवसेनेला नाकारलं, असं सांगत 'सगळं जग सुधारेल पण, कोल्हापूर सुधारणार नाही,' असा मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला होता.

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत केलेल्या कथित वक्तव्यावरून सोशल मीडियावर रान उठलं आहे. या प्रकारावर खुद्द चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केलाय. सोशल मीडियावर माझी बदनामी करण्यात येत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

'जग सुधारेल पण कोल्हापूर नाही'; चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून रोष

काय आहे प्रकरण?
विधानसभा निवडणूक निकालानंतर आज, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. कोल्हापुरात महायुतीच्या जागा आठ वरून एकवर आल्यानं त्याविषयीची कारण मिमांसा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी एका व्हॉट्स अप मेसेजचा संदर्भ देत. भूमिका मांडली होती. त्या मेसेजमध्ये भाजपने अंबाबाई मंदिर, कोल्हापूरचे विमानतळ, रेल्वे सेवा याविषयी कामं केल्याचे संदर्भ  देण्यात आले होते. तसेच टोल आणि एलबीटी रद्द केल्याचा उल्लेख होता. इतकं करूनही कोल्हापूरकरांनी भाजप-शिवसेनेला नाकारलं, असं सांगत 'सगळं जग सुधारेल पण, कोल्हापूर सुधारणार नाही,' असा ही मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच हे वक्तव्य केल्याचे एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले. त्या वाहिनीचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चंद्रकातं पाटील यांना सगळ्यांनीच ट्रोल करायला सुरुवात केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा केला आहे.

मंडलिक प्रवृत्तीचा शिवसेनेनं विचार करावा : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'कोल्हापुरातील महायुतीच्या पराभवाची कारणे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात मी व्हॉट्स अपवरील एका मेसेजचा संदर्भ दिल होता. त्यातील भाजपविषयीच्या सकारात्मक बाबी मी मांडत होतो. पण, त्या मेसेजमधील शेवटच्या वाक्याशी मी कदापीही सहमत नाही. या एका वाक्यावरून माझी सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.'

काय होता व्हॉटस्अप मेसेजचा आशय?

  1. त्यांनी (काँग्रेस-राष्ट्रवादीने) कोल्हापूरची विमानसेवा दहा वर्षे बंद ठेवली, भाजपने पुन्हा सुरू केली
  2. त्यांनी शहर भकास केलं, भाजपने केएसबीपीच्या माध्यमातून ते सजवलं
  3. त्यांनी रेल्वे सेवा जैसे थे ठेवली, भाजपने रेल्वेचं विद्युतीकरण केलं
  4. त्यांनी टोल आणला, भाजपने घालवला
  5. त्यांनी एलबीटी आणला, भाजपने एलबीटी रद्द केला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil clarification on controversial statement about kolhapur