'जग सुधारेल, कोल्हापूर नाही'; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर संताप

टीम ई-सकाळ
Sunday, 27 October 2019

चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या जबाबदार व्यक्तीनं हे संतापजनक वक्तव्य केल्यामुळं सोशल मीडयावर त्यांच्या विरोधात रान उठलं आहे.

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकालानंतर आज,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. त्या त्यांनी कोल्हापूरकरांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ही नाराजी व्यक्त करताना हा निकाल अनाकलनीय आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मंडलिक प्रवृत्तीचा शिवसेनेने विचार करावा : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात झालेला युतीचा पराभव खूपच जिव्हारी लागला आहे. कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी या पराभवाविषयी खंत व्यक्त केली. आणखी किती कामं करायची?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मतदार राजालाचा या पराभवाचं कारणं विचारलं. अर्थात त्यांनी या पराभवाला मतदारांना दोषी ठरवत नसल्याचंही स्पष्ट केलं. परंतु, पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी 'सगळं जग सुधारेल पण, कोल्हापूर सुधारणार नाही,' असं वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या जबाबदार व्यक्तीनं हे संतापजनक वक्तव्य केल्यामुळं सोशल मीडयावर त्यांच्या विरोधात रान उठलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेचा एका टीव्ही वाहिनीचा स्क्रीन शॉट व्हॉट्स अप आणि फेसबुकवर शेअर केला जातोय. हा कोल्हापूरचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. 'तुम्ही कोल्हापुरातून का पळून गेला?' 'तुमचे कोल्हापूरसाठी काय योगदान?', अशा आशयाचे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांनाच विचारलं, 'सांगा काय चुकलं?'

बंडखोरी रोखता आली नाही
भाजप-शिवसेनेला राज्यात बंडखोरी रोखता आली नाही, अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. बंडखोरीमुळेच राज्यात राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. पण, भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीतपेक्षा कमी जागा लढवूनही शंभरी गाठली. तसेच, राज्यात सलग दोनवेळा शंभर जागा जिंकणारा भाजप एकमेव पक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

काय घडलं कोल्हापुरात?
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात धवल यश मिळाले होते. त्यावेळी दहा जागांपैकी शिवसेनेचे सहा आणि भाजपचे दोन आमदार निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या मतदारांनी शिवसेना आणि भाजपला नाकारलं. शिवसेनेला सहा पैकी राधानगरी-भुदरगड (प्रकाश आबिटकर) ही एकच जागा टिकवता आली. तर, कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांचा तर, इचलकरंजीत सुरेश हाळवणकर यांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेला एक तर भाजपला जिल्ह्यात भोपळा मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil controversial statement about kolhapur viral social media