चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात भाजपला भोपळा !

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी सहा जागा शिवसेनेकडे आणि प्रत्येकी दोन जागा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतच काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार झाली होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात क्रमांक दोनचे प्रभावशाली नेते म्हणून गेल्या पाच वर्षांत उदयास आलेले चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजप शुन्यावर आला आहे. महाराष्ट्राचे राजकारण पाहता पाहता चंद्रकांतदादांच्या हातातून कोल्हापूर जिल्हाच सुटला, अशी अवस्था झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी सहा जागा शिवसेनेकडे आणि प्रत्येकी दोन जागा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतच काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार झाली होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि आमदार सुरेश हाळवणकर इचलकरंजीतून आणि अमल महाडिक कोल्हापूर उत्तरमधून पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघांमध्ये पंचगंगा नदीच्या महापुराचा फटका सर्वाधिक बसला होता. महापुराच्या काळात राज्य सरकारने जनतेच्या मदतीसाठी जलद पावले उचलली नाहीत, अशी टिका झाली होती. 

महाडिक कुटुंबाला लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या पराभवाने पहिला धक्का बसला होता. त्यावेळी शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी खासदारकी संपादन केली. त्यानंतर धनंजय यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचा मोठा वाटा होता, असे मानले गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय यांचे चुलत बंधू अमल भाजपच्या उमेदवारीवर आमदार झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती यंदा होईल, असे मानले जात होते. मात्र, तसे झाले नाही. 

पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्वाची मानली गेली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेली चंद्रकांत पाटील यांची जवळिक राज्याच्या राजकारणात चर्चेत होती. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांना विरोधकांकडून लक्ष्यही केले जात होते. पाटील यांनी विधान परिषदेच्या दाराने सत्तेत प्रवेश केला आहे आणि त्यांनी कधी विधानसभा निवडणूक लढविलेली नाही, असे विरोधकांनी वारंवार निदर्शनास आणले. त्याला उत्तर म्हणून चंद्रकांत पाटलांनी यंदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांना पक्षाने पुणे जिल्ह्यातील कोथरूडमधून उमेदवारी दिली. चंद्रकांत पाटील कोथरूडमधून विजय होत आहेत; मात्र, खुद्द कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपने दोन्ही जागा गमावल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Chandrakant Patil major loss in Kolhapur district for Maharashtra Vidhan Sabha 2019