पालिका निवडणुकीतल्या यशाने भाजप नेत्यांना बळ

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नगर : नगरपालिकांच्या निवडणुकांमधल्या चांगल्या कामगिरीने भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्याना मोठे बळ आले आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर "त्यांच्यात आता दम नाही. जिल्ह्यात आमचाच दबदबा,' असे सांगत जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे आपली पाठ थोपटून घेत आहेत. कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात व विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना हे शिंदे यांचे हे बोल जिव्हारी लागत आहेत. 

नगर : नगरपालिकांच्या निवडणुकांमधल्या चांगल्या कामगिरीने भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्याना मोठे बळ आले आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर "त्यांच्यात आता दम नाही. जिल्ह्यात आमचाच दबदबा,' असे सांगत जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे आपली पाठ थोपटून घेत आहेत. कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात व विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना हे शिंदे यांचे हे बोल जिव्हारी लागत आहेत. 

नगर जिल्ह्यात कायम राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व राज्याला माहीत आहे. जिल्हा पूर्णपणे आपल्या कवेत असावा, असा विखे यांचा प्रयत्न नेहमीच असतो. त्यामुळे इतर तालुक्‍यांतील निवडणुकांत ते वैयक्तिक लक्ष घालत होते. आपल्या माणसांना वेगवेगळ्या सत्तास्थानी घुसवणे हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या या खेळीला विरोधक कायम दचकून असतात. पाथर्डीत विखेंचे वर्चस्व तेथील विरोधकांना कायम खटकत असे. कर्जत-जामखेडमध्ये त्यांचे कार्यकर्तेच तयार होऊ नये म्हणून प्रयत्न होत असे.

"थाळा वाजवून साप घरात घेण्याचे' धोरणच नको, म्हणून नेते संबंधितांना दूर ठेवत होते. पारनेरमध्ये मात्र विखेंचे वर्चस्व सर्वपरिचित आहे. उत्तरेतील तालुके आपल्या "पॉकेट'मध्ये ठेवण्याचे कौशल्य त्यांना चांगलेच अवगत आहे. संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा सक्षमपणे उभी केली. विखे व थोरात कॉंग्रेसमध्येच असल्याने एकाच पिंजऱ्यात दोन सिंह राहू शकत नाही, त्यात विरोधक त्यांना डिवचण्याचे काम करतात. ही अनेक दिवसांची अंतर्गत दुही एक ना एक दिवस उफाळणारच होती. नगरपालिकेच्या निवडणुकीत विखेंचे पारडे खाली आल्याने थोरातांनी "मनातलं' बोलूनच टाकलं. या सर्व घडामोडींचा फायदा भारतीय जनता पक्ष घेऊ लागला आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने भाजपचे वारे जिल्ह्यात जरा जास्तच वेगाने वाहू लागले आहेत. याचे प्रत्यंतर भाजपचे मंत्री असलेले व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट जाणवते. 

नगरपालिकेत विजय मिळविलेल्या भाजप नगराध्यक्षांचा सत्कार नुकताच झाला. त्यात प्रा. राम शिंदे यांनी विरोधकांवर केलेली फटकेबाजी आगामी बदलत्या राजकारणाची नांदी ठरू पाहत आहे. विरोधकांत आता दम राहिला नाही. ते एकमेकांत भांडत आहेत. त्याचा फायदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घ्या, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 
आपल्याकडे सध्या "इनकमिंग' सुरू आहे. त्यांच्याकडे सध्या पाचशे व हजाराच्या नोटांचे "आऊटगोईंग' सुरू असल्याचा टोला प्रा. राम शिंदे यांच्याकडून लगावला जात असल्याने राहुरी तालुक्‍यात नोटा कोणी वाटल्या याच्यावर सूचक भाष्य करत या मुद्याचे भांडवल आगामी निवडणुकांत केले जाईल हे नक्की.

Web Title: bjp leaders cheer for victory in nagar