पाच पंचायत समितीत फुलले कमळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मिरजेत भाजपला स्वाभिमानीचे बळ, इतिहासात प्रथमच खानापूरमध्ये शिवसेनेचा झेंडा, वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळचा गड राष्ट्रवादीने राखला 

सांगली - जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडी आज पार पडल्या. आटपाडी, पलूस, कडेगाव, जत आणि मिरज पंचायत समित्यात भाजपचे कमळ फुलले. मिरज तालुक्‍यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील वादाचा फायदा उठवण्यात भाजपला यश आले. स्वाभिमानी विकास आघाडीने भाजपला बळ दिल्याने सभापतिपदाचा मार्ग सुकर झाला. उपसभापतीसाठी कॉंग्रेसनेही भाजपच्या पारड्यात मते टाकून राष्ट्रवादीला एकाकी पाडले. वाळवा, तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीने गड कायम राखले. शिराळ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता कायम राहिली. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच खानापूर पंचायत समितीच्या रूपाने शिवसेनेचा झेंडा फडकला. पदाधिकारी निवडीनंतर सर्व पंचायत समितीबाहेर नेते व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. 

मिरज आणि जतमध्ये सत्तेसाठी भाजपकडे काठावरचे बहुमत होते. यामुळे निवडीपूर्वी येथे राजकीय हालचाली गतीने घडल्या. मिरजेत सभापती, उपसभापती निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप 11, कॉंग्रेस सात, राष्ट्रवादी दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक, विकास आघाडी एक असे पक्षीय बलाबल आहे. सभापतिपदासाठी भाजपकडून जनाबाई पाटील, कॉंग्रेसच्या पूनम कोळी यांचे अर्ज दाखल झाले. पाटील यांना कोळी यांच्यावर 12 विरुद्ध 10 अशी बाजी मारली. भाजपला विकास आघाडीने बळ मिळाल्याने सभापतीसाठी वर्णी लागली. उपसभापतीसाठी काकासाहेब धामणे (भाजप), अशोक मोहिते (राष्ट्रवादी), तर कॉंग्रेसकडून रंगराव जाधव यांचा अर्ज भरला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत एकमत न झाल्याने कॉंग्रेसने सातही मते भाजपच्या पारड्यात टाकली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला साथ दिली. त्यामुळे उपसभापती धामणे यांनी मोहिते यांच्यावर 20 विरुद्ध 2 मतांनी विजय मिळविला. कॉंग्रेसचे जाधव यांनी स्वत:चे मतही भाजपला दिल्याचे स्पष्ट झाले. 

जतमध्ये भाजपची बाजी 
जतमध्ये भाजपकडे काठावरचे बहुमत होते. 18 पैकी 9 जागा भाजपला मिळाल्या होत्या. कॉंग्रेसला 7, वसंतदादा विकास आघाडी आणि जनसुराज्यला प्रत्येकी एक जागा आहे. भाजपने कॉंग्रेसचे नाराज गटाचे नेते सुरेश शिंदे यांच्याशी समझोता करून वसंतदादा विकास आघाडीचा पाठिंबा मिळविला. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. सभापतिपदी मंगल जमदाडे व उपसभापतिपदी शिवाजी शिंदे बिनविरोध झाले. 

कडेगाव, पलूस, आटपाडीतही कमळ 
कडेगावच्या सभापतिपदी मंदाताई करांडे, उपसभापतिपदी रवी कांबळे यांच्या निवडी झाल्या. पलूस सभापतिपदी सीमा मांगलेकर ( भाजप), उपसभापतिपदी अरुण पवार ( राष्ट्रवादी) यांची बिनविरोध निवड झाली. पलूस, कडेगावला भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांच्या प्रयत्नातून प्रथमच सत्ता काबीज करण्यात यश आले. आटपाडीत सभापतिपदी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख, तर उपसभापतिपदी गोपीचंद पडळकर गटाचे तानाजी यमगर यांची निवड झाली. 

वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची सत्ता 
वाळवा पंचायत समितीत राष्ट्रवादीला बहुमत मिळाले आहे. सभापतिपदी सचिन हुलवान, उपसभापतिपदी भास्कर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीने आमदार जयंत पाटील यांचा ताकद अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तासगावमध्ये सभापतिपदी राष्ट्रवादीच्या माया एडके, उपसभापतिपदासाठी संभाजी पाटील यांच्या निवडी झाल्या. आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात आमदार सुमनताई पाटील यांना तासगावचा गड कायम ठेवयात यश आले. कवठेमहांकाळमध्ये सभापतिपदी राष्ट्रवादीचे मनोहर पाटील आणि उपसभापतिपदी स्वाभिमानी विकास आघाडीच्या सरिता शिंदे यांची निवड झाली. 

खानापुरात सेनेचा झेंडा 
जिल्ह्याच्या इतिहासात शिवसेनेला प्रथमच पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता मिळाली. सभापतिपदी मनीषा बागल, उपसभापतिपदी बाळासाहेब नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नाने सेनेचा झेंडा फडकला. 

शिराळ्यात आघाडीची सत्ता कायम 
शिराळ्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आहे. सभापतिपदी मायावती कांबळे, उपसभापतिपदी सम्राटसिंह नाईक यांची बिनविरोध निवड झाली. 

Web Title: BJP in panchyat samittee