सांगली जिल्ह्यात पंचायत समितीत भाजपचा षटकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

कवठेमहांकाळला पूर्वीचे कट्टर आबा समर्थक आणि सध्या संजयकाका गटाचे शिलेदार असलेले चंद्रकांत हाक्के यांचे चिरंजीव विकास हाक्के सभापती झाले आहे. त्यासाठी आबा गटाने काका गटाला साथ दिली आहे.

सांगली - सरत्या वर्षातील शेवटच्या राजकीय ड्राम्यामध्ये भाजपने सरसी केली. पंचायत समिती सभापती निवडीत षटकार ठोकत दहापैकी सहा समित्यांचे सभापतिपद मिळवले. काही ठिकाणी काँग्रेसच्या तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने सभापदीपद पटकावले आहे. कवठेमहांकाळ पंचायत समितीत आबा-काका गटाचा ‘विकास’ जिल्ह्याच्या राजकारणात धक्का देणारा ठरला. तेथे घोरपडे गटाला बगल देण्याची राजकीय खेळी यशस्वी झाली. 

कवठेमहांकाळला पूर्वीचे कट्टर आबा समर्थक आणि सध्या संजयकाका गटाचे शिलेदार असलेले चंद्रकांत हाक्के यांचे चिरंजीव विकास हाक्के सभापती झाले आहे. त्यासाठी आबा गटाने काका गटाला साथ दिली आहे. तासगावमध्ये सभापती पद कायम राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे. तेथे डॉ. शुभांगी पाटील सभापती झाल्या आहेत. शिराळा तालुक्‍यात नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या वैशाली माने यांनी सभापतीपद पटकावले आहे. जयंत पाटील यांच्या गडात वाळव्यात राष्ट्रवादीच्या शुभांगी पाटील यांनी बाजी मारली. खानापूर पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात असून तेथे मारुती शिंदे यांना सभापतीपदी संधी मिळाली आहे. 

हेही वाचा - हातकणंगलेत शिवसेनेचे वर्चस्व; पण नगराध्यक्ष काँग्रेसचा 

'यांना' मिळाली सभापतीपदाची संधी

भाजपने पलूसमध्ये दीपक मोहिते, जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांचे चिरंजीव मनोज जगताप, मिरजमध्ये मालगावच्या शुभांगी सावंत, आटपाडीत भूमिका बेरगळ तर कडेगाव पंचायत समितीत मंगल क्षीरसागर यांना सभापतीपदी संधी दिली आहे. जतमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. जगताप यांच्या विधानसभा पराभवाने सत्तेला सुरुंग लागेल, असे सांगितले जात होते, मात्र राजकीय चातुर्य दाखवत त्यांनी मनोज जगताप यांना ‘खुर्ची’वर बसवले.

हेही वाचा - महाविकास आघाडी गोव्यात ठरवणार कोल्हापूर जि. प. चा अध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Power In Six Panchayat Samitti In Sangli Marathi News