महाविकास आघाडी गोव्यात ठरवणार कोल्हापूर जि. प. चा अध्यक्ष

ZP President Election Decision In Goa By Mahavikas Aghadi Kolhapur Marathi News
ZP President Election Decision In Goa By Mahavikas Aghadi Kolhapur Marathi News

कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप मित्रपक्षांचे सदस्य सहलीवर आहेत. दोन्ही बाजूनी संख्याबळ जमवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांची बैठक घेण्यासाठी १ जानेवारीस मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील गोव्याला जाणार आहेत. या वेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या नावांची निश्‍चिती करण्यासह फॉर्म्युलाही ठरवला जाणार आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी २ जानेवारीस निवडणूक होत आहे. सध्या जिल्हा परिषदेवर भाजप, मित्र पक्षांची सत्ता आहे; मात्र राज्यातील सत्ताबदल आणि जिल्हा परिषदेतील सत्तेत अपेक्षित वाटा न मिळाल्याने घटक पक्ष नाराज झाल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. 

नाराज सदस्यांचे मन वळवण्यात आघाडीला यश

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जनसुराज्यचे आमदार विनय कोरे, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. पुरेसे संख्याबळ जमवण्यासाठी विरोधी गटाच्या सदस्यांशी संपर्क साधला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही सत्ता परिवर्तनासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. आघाडीचे सदस्य गोव्याला सहलीवर पाठवले आहेत.  आघाडीतील नाराज सदस्यांचे मन वळवण्यातही त्यांनी यश मिळवले आहे. मंत्रिमंडळात आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांना स्थान मिळाल्याने आघाडीचे मनोबल वाढले आहे.

अध्यक्षपदासाठी बजरंग पाटील चर्चेत

अध्यक्षपदासाठी बजरंग पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. श्री. पाटील काँग्रेसचे गगनबावडा तालुक्‍याचे ४३ वर्षे अध्यक्ष आहेत. त्यांच्या काँग्रेस निष्ठेचे फळ देण्याची तयारी काँग्रेसने निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. श्री. पाटील मंत्री पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. आमदार पी. एन. यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या जयवंतराव शिंपींच्या नावाची चर्चा आहे.

स्वाभिमानीला महिला बालकल्याण, शिक्षण?

स्वाभिमानी महाविकास आघाडीत सहभागी आहे. संघटनेचे दोन सदस्य आहेत. यातील शुभांगी शिंदे यांनी महिला बालकल्याण सभापती म्हणून काम केले आहे. त्यामुळे या वेळी संघटनेच्या डॉ. पद्माराणी पाटील यांना सभापतिपद मिळण्याची शक्‍यता आहे. डॉ. पाटील यांना महिला बालकल्याण किंवा शिक्षण सभापती होण्याचा मान मिळेल आहे.

सेनेला समाजकल्याण, बांधकाम

माजी आमदार सत्यजित पाटील व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर गट सहभागी होईल, अशी चर्चा आहे. असे झाले तर पहिल्या वर्षासाठी सरुडकर गटाचे हंबीरराव पाटील यांना बांधकाम सभापतिपद मिळण्याची शक्‍यता आहे. अपक्ष रसिका पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. उल्हास पाटील गटाच्या स्वाती सासणे यांना समाजकल्याण सभापतिपद मिळण्याची शक्‍यता आहे. दुसऱ्या वर्षात आमदार आबीटकर व मिणचेकर गटाच्या सदस्याला संधी मिळेल, अशी शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com