भाजप म्हणजे तीन तिगाडा काम बिगाडा - प्रणिती शिंदे

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 10 मे 2018

भाजपची सत्ता येऊन काहीच फरक पडला नाही हे लोकाना माहिती झाले आहे, आता लोकांसाठी तरी दोन मंत्र्यांनी आणि खासदाराने जागे होणे आवश्यक आहे.
- प्रणिती शिंदे, आमदार

सोलापूर - भाजपचे सरकार बुडेल इतके पाणी उजनी धरणात आहे, तरीसुद्धा सोलापूरकर तहानलेले आहेत. दोन मंत्री आणि खासदार असूनही येथील
भाजपची स्थिती ही तीन तिगाडा काम बिगाडासारखी असल्याचा टोला आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला.

पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांमध्ये भरपूर पाणी असतानाही नियोजनाअभावी सध्या सोलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या संदर्भात विचारले असता आमदार शिंदे म्हणाल्या, "दोन मंत्र्यांपैकी एका मंत्र्याला मोदींच्या सभेसाठी मंडप बांधण्याची जबाबदारी दिली होती. ते काम त्यांनी जितक्या तन्मयतने केले तसे सोलापुरात ते फारसे काही करताना दिसत नाहीत. उजनी धरण भरलेले आहे. तरीसुद्धा आज सोलापूरकरांना पाच-सहा दिवसाआड पाणी मिळते. आमची सत्ता असताना अनेकवेळा दुष्काळाचा सामना करावा लागला. पण आम्ही तातडीने उपाय योजना करून पाणी उपलब्ध केले. धरण मृतसाठ्यात गेले तरी, आजच्यासारखी स्थिती निर्माण झाली नव्हती. त्याला नियोजनाचा अभाव आहे. नियोजन करायला कोणी तयार नाही. एकदा निवडून आले आणि त्यांची जबाबदारी संपली. दोन मंत्री व खासदार असून काय उपयोग. एक या दिशेने बघतोय, तर दुसरा तिकडे बघतोय. भाजपचे सरकार बुडेल इतके पाणी उजनी धरणात आहे, तरीसुद्धा सोलापूरकर तहानलेले आहेत. दोन मंत्री आणि खासदार असूनही येथील
भाजपची स्थिती ही तीन तिगाडा काम बिगाडासारखी आहे असे म्हटल्यास ते चुकीचे होणार नाही."

मुलभूत सुविधा देण्यासाठी झोनमध्ये पैसे उपलब्ध नाहीत असे सांगतात. मग भाजपची सत्ता येऊन काय उपयोग झाला. पाणी नाही, परिवहनचे कोलॅप्स झाले आहे. मग काय उपयोग आहे या दोन मंत्र्यांचा. मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊनही त्यांच्यात बदल झाला नाही. एका बोर्डाला त्यांचे नगरसेवक नसतात, तर दुसऱ्या बोर्डाला ह्यांचे नगरसेवक नसतात, अशी स्थिती आहे. अरे काय चाललंय. महापालिकेत काय सर्कस सुरु आहे का. आमच्यावेळीही आरोप झाले. पण साहेबांच्या (सुशीलकुमार शिंदे) शब्दापलिकडे कोणी जात नव्हते. कसेही असले तरी शहराचा प्रश्न आला की गटतट विसरून, म्हणजे गटतट नव्हतेच मुळी.एकच शिंदे गट होता. लोकांच्या कामासाठी आम्ही एकत्र आलो, एका रात्रीत दहा-दहा कोटींची पाईपलाईन बसविल्या. दुष्काळात पाच कोटींचे पंप मागवून पाणीपुरवठा केला, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले. 

आज प्रत्येक ठिकाणी सुरवातीला अर्धा तास घाण पाणी येते. कामगार वैतगाले आहेत. रात्री अपरात्री पाणीपुरवठा केला जातो. नियोजनच नाही. एक तासात नियोजन होते. पण ईच्छाशक्तीच नाही. पाणीपुरवठ्याच्या बैठकीला मुंबईत गेले की मंत्री गिरीष महाजनही नसतात. तिथं पण गट-तट. हे काही गांभीर्यच नाही ना. त्यामुळे आता लोकांना कळून चुकले आहे. आता रेशन दुकानात माल नाही. विडी कामगारांच्या पगारी बंद आहेत. पाणी नाही सोलापुरात. स्वच्छता तर होतच नाही, असेही आमदार शिंदे म्हणाल्या.

Web Title: BJP Praniti Shinde Politics