अन् सत्ताधारी पक्षावरच आली आंदोलन करण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

आंदोलन करताना आमदार पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सींगच्या तत्वाचे पालन केले. पण आमदारांनीच आंदोलन सुरू केल्यामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ सुरू झाली. आंदोलन स्थळापासून शहापूर पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे.  

बेळगाव - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात शासकीय सुविधांबाबत सत्ताधारी गटाच्या आमदारांनीच आंदोलन केल्याची घटना बेळगावात घडली आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी रविवारी सायंकाळी शहापूर येथील बॅ. नाथ पै चौकात आपल्या कार्यकर्त्यांसह एक तास आंदोलन केले. टाळेबंदीच्या काळात नागरिकांना मोफत दूध वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार दुधाचे वाटपही करण्यात येत आहे. पण या दूध वाटपात पक्षपात होत असल्याचा आमदार पाटील यांचा आरोप आहे. त्यामुळेच त्यानी बॅ. नाथ पै चौकात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष याकडे वेधले आहे. 

हे पण वाचा - खुशखबर : दहावी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसाठीचे वेळापत्रक लवकरच....

हे आंदोलन करताना आमदार पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सींगच्या तत्वाचे पालन केले. पण आमदारांनीच आंदोलन सुरू केल्यामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ सुरू झाली. आंदोलन स्थळापासून शहापूर पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे आंदोलनाची दखल घेत शहापूरचे पोलिस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलनस्थळी जावे लागले. आमदार पाटील हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे. टाळेबंदीच्या काळात दूधवाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनीच घेतला आहे. त्या निर्णयाचा भाग म्हणून आमदार अभय पाटील यांनी स्वतः कार्यकर्त्यांसह आपल्या मतदारसंघात दुधाच्या पाकीटांचे वाटप केले आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनीही दुधाच्या पाकीटांचे वाटप केले आहे. पण आमदार पाटील यांच्या मते प्रशासनाकडून दूध वाटप योग्य पद्धतीने केले जात नाही. दूध वाटपाची जबाबदारी प्रशासनाची आहे, पण हे दूध गरजूंना मिळतच नाही अशी त्यांची तक्रार आहे. दूध वाटपासाठी गेल्यानंतर वितरकांकडून किंवा मोजक्‍यांकडूनच त्यावर डल्ला मारला जात असल्याचा प्रकार काही दिवासंपूर्वी घडला होता. शिवाय शहराच्या काही भागात दूध वाटप योग्य पद्धतीने होत आहे तर काही भागात होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणे अपेक्षीत होते. पण टाळेबंदीच्या काळात त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला. सत्ताधारी आमदार असूनही शासनाच्या विरोधात बोलण्याचे धाडस याआधीही आमदार पाटील यांनी दाखविले आहे. नगरविकासमंत्री बैराती बसवराज यांच्या बेळगावातील आढावा बैठकीत त्यांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांवर थेट हल्लाबोल केला होता. आता ते थेट प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. 

हे पण वाचा - ..तर कोरोनालढ्यात निवृत्त सैनिक बजावतील महत्वपूर्ण भूमिका...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp ruling party protesting belgaum