'भाजपचे काऊंटडाऊन सुरू'

chaganbhujbal
chaganbhujbal

यशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व समविचारी पक्षांच्या महाआघाडीचे सरकार येणार असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भेटीसाठी शिवरत्न बंगला येथे आल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मीडियाची गळचेपी करणारे भाजप सरकार इतरांना कसे सोडेल असे म्हणत सरकार सुडाचेच राजकारण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बॅंक, प्लॅनिंग कमिशन, सीबीआय, सुप्रिम कोर्ट अशा जगमान्य संस्थांत त्या पदास योग्य नसलेले आपलेच जवळचे लोक नेमून आपणास हवे तसे निर्णय घ्यावयास भाग पाडतात, परंतु त्यांनीच नेमलेले लोक राजीनामे देतात, यातूनच त्याच्या दहशतीची कल्पना येते. सरकारने या संस्थांच्या बाबतीत जगभरात हसू करून घेतले आहे. 

येणाऱ्या निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना दिल्ली ते गल्लीपर्यंतची सर्व माहिती आहे. त्यामुळे कोणाला कोठून संधी द्यावयाची, हे ते बरोबर ठरवितात. म्हणून त्यांनी जेथून संधी दिली, तिथे काम करू. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, विजयदादांचे हात बळकट करण्यासाठीच ते चालू असून आपणसुद्धा त्यासाठीच आलो असल्याचे सांगितले. 

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसास येऊ शकलो नसल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी त्यांच्याबरोबर प्रा. जयंत भंडारी, सांगोला येथील के. सी. माळी, सुरेश माळी, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शाळिग्राम माळकर, बापूसाहेब भुजबळ, अंबादास गारुडकर, अनिल लडकत, आबा भोंगळे, शिवाजीराव नलवडे, डॉ. ज्ञानेश्‍वर महाजन, राजकुमार हिवरकर, सागर यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com