मुरगूडसह पाच नगरपालिकांत सत्तांतर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

  • कागलमध्ये मुश्रीफांचा करिष्मा; पण सत्तेसाठी रस्सीखेच 
  • जयसिंगपूरमध्ये राष्ट्रवादी आघाडीचा 'गड आला पण सिंह गेला' 
  • इचलकरंजीत नगराध्यक्ष भाजपचा, सत्ता कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची 
  • कुरुंदवाडमध्ये सत्तांतर, कॉंग्रेसचा नगराध्यक्ष 
  • मुरगूडमध्ये पाटील बंधूंसह मुश्रीफांनाही शिवसेनेची धोबीपछाड 
  • गडहिंग्लजमध्ये जनता दलाचे शिंदे हीरो, बाकीचे सारे झीरो 
  • मलकापूर, पन्हाळ्यात कोरेच ठरले 'लई भारी' 
  • पेठवडगावमध्ये सत्तारूढ यादव आघाडीचे पानिपत, युवक क्रांती सत्तेवर 

कोल्हापूर : जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या व राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभांतून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या नगरपालिका निवडणुकीत मुरगूडसह पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव व कुरुंदवाड नगरपालिकेत मतदारांनी सत्तांतर घडवत प्रस्थापितांना घरी बसवले. या निवडणुकीत भाजपने चांगलीच बाजी मारली. 

इचलकरंजीत आमदार सुरेश हाळवणकर, मलकापूरला शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, वडगावमध्ये आमदार सतेज पाटील व आघाडीच्या नेत्या सौ. विद्याताई पोळ, मुरगूडमध्ये 'गोकुळ'चे संचालक रणजित पाटील व त्यांचे बंधू प्रवीणसिंह यांना धक्का बसला. आपापले गड जिंकून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी मंत्री विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रा. संजय मंडलिक यांनी आपला दबदबा कायम राखला. 

जिल्ह्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागलेल्या कागलमध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या 20 पैकी नऊ जागा जिंकून आमदार मुश्रीफ यांनी आपला करिष्मा कायम ठेवला; मात्र सत्तेसाठी त्यांना दोन नगरसेवकांची गरज आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची मदत मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुरगूडमध्ये मात्र श्री. मुश्रीफ यांनी 'गोकुळ'चे संचालक रणजितसिंह पाटील व प्रवीणसिंह पाटील यांच्याशी आघाडी करूनही या आघाडीचा धुव्वा उडाला. शिवसेनेने प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर घडवत नगरपालिकेची सत्ता व नगराध्यक्षपदही जिंकले. 

मलकापूर, पन्हाळा नगरपालिकेत 'जनसुराज्य'ने सत्तांतर घडवताना शिवसेना आमदार सत्यजित पाटील यांच्या आघाडीला धोबीपछाड दिली. या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष व सत्ताही 'जनसुराज्य'ने पटकावली. त्यांच्यासोबत मलकापूरमध्ये भाजप, स्वाभिमानीची साथ होती. पन्हाळ्याचे विद्यमान नगराध्यक्ष आसिफ मोकाशी 'जनसुराज्य'चे असले तरी या वेळी ते विरोधात होते. श्री. मोकाशी यांनी आमदार पाटील यांच्या मदतीवर आघाडी केली; पण त्यांचा सुफडासाफ झाला. 'जनसुराज्य'ने 17 पैकी 12 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. 

पेठवडगावमध्येही मतदारांनी सत्तांतर घडवले. युवक क्रांती आघाडीने (सालपे गट) कॉंग्रेसप्रणित यादव आघाडीचा धुव्वा उडवून नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या 13 जागा जिंकून सत्ताही काबीज केली. भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. यादव आघाडीच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील यांच्या सभा झाल्या होत्या; पण सत्ता राखण्यात यादव आघाडी अपयशी ठरली. या आघाडीच्या प्रमुख विद्याताई पोळ मात्र विजयी झाल्या. 

जयसिंगपूरमध्ये नगराध्यक्ष ताराराणी-भाजपचा आणि सत्ता मात्र राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीची, अशी स्थिती झाली. 'गड आला पण सिंह गेला' असेच जयसिंगपूरच्या निकालाबाबत म्हणावे लागेल. मात्र, नगरसेवकपदाच्या 24 पैकी 13 जागा जिंकून राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपला दबदबा कायम ठेवला. कुरुंदवाडमध्येही सत्तांतर घडवताना मतदारांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेल्या माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्यासह त्यांच्या आघाडीला घरी बसवले. श्री. डांगे विद्यमान सभागृहात राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष होते. या ठिकाणी नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे जयराम पाटील विजयी झाले. नगरपालिकेत कॉंग्रेस व भाजपला प्रत्येकी सहा तर पाच जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. दोन्ही कॉंग्रेस एकत्र येऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याची शक्‍यता आहे. 

गडहिंग्लज शहर हा जनता दलाचा बालेकिल्ला. येथे गेल्या दीड वर्षापासून त्यांची सत्ता आहे. या वेळी नगराध्यक्षपदासह 10 जागा जिंकून हा गड आपल्याकडेच राखण्यात माजी आमदार श्रीपतराव शिंदे यशस्वी झाले. त्यांच्या कन्या सौ. स्वाती कोरी या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. सौ. कोरी यांची चांगली प्रतिमा, वक्‍तृत्वशैली व स्थानिक मतदारांशी असलेले चांगले संबंध त्यांना फायद्याचे ठरले. 

जिल्ह्यातील सर्वांत मोठी नगरपालिका असणाऱ्या इचलकरंजीत नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. अलका स्वामी निवडून आल्या; मात्र भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे वर्चस्व असूनही नगरपालिकेची सत्ता मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडेच राहिली आहे. हा निकाल श्री. हाळवणकर यांना धक्का समजला जातो. या निकालाने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या गटाची ताकद वाढली आहे. 

चंद्रकांत पाटील यांची खेळी यशस्वी 
नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हाचा आग्रह नाही, की शिवसेना सोबत येईल का नाही याचा विचार न करता पालकमंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीची रणनीती आखली. शिवसेनेला काही ठिकाणी सोबत घेतले; पण काही ठिकाणी स्थानिक आघाडीशी संधान साधून राष्ट्रवादी व कॉंग्रेसची मक्तेदारी असलेले नगरपालिकांचे हे गड भेदण्याचा प्रयत्न केला. त्यात ते पूर्णपणे यशस्वी ठरले नसले तरी काही नगरपालिकांत सत्ता मिळवण्याची किंवा सत्तेसोबत जाण्याची त्यांची खेळी यशस्वी झाली आहे. 

Web Title: BJP shines in Kolhapur region Civic body elections