जिल्हा परिषदेत भाजप "किंगमेकर' ठरेल! 

संजय साळुंखे, सातारा 
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

डॉ. येळगावकर; 20 ते 22 जागा मिळवू, तीन ते चार पंचायत समित्यांतही सत्ता स्थापन करू 

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचा असेल किंवा भाजपला घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही यश मिळवू. जिल्ह्यातील किमान चार पंचायत समित्यांवरही भाजप वर्चस्व मिळवेल, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी केलेली बातचीत... 

प्रश्‍न - मिनी विधानसभेत भाजपची काय स्थिती आहे? 
जिल्ह्यात भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण जागांपैकी 90 टक्के ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. आमच्या दृष्टीने ही मोठी बाब आहे. ग्रामीण भागातही भाजप रुजतोय. त्यामुळे आम्ही चांगले यश मिळवू. भाजपला जिल्हा परिषदेच्या 20 ते 22 जागा मिळतील. राष्ट्रवादीही एवढ्याच जागा मिळवेल, असा अंदाज आहे. कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर जाईल. या स्थितीत भाजपला घेतल्याशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही. किमान तीन ते चार पंचायत समित्यांवर भाजपचे वर्चस्व असेल. 

प्रश्‍न - माण, खटाव तालुक्‍यांत काय होईल? 
माणमधून गटाच्या तीन व खटावमधून तीन ते चार जागा भाजपला मिळतील. माणचे सभापतिपद राखीव असल्याने आम्ही थोडे चाचपडतोय. मात्र, माण, खटावमध्ये आम्ही सत्ता स्थापन करू. 

प्रश्‍न- अन्य पक्षांतील नेत्यांच्या आयातीमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज दिसतात? 

निवडून येण्याची क्षमता व उमेदवाराची आर्थिक स्थिती या दोन निकषांवर भापजने उमेदवारांची निवड केली आहे. त्यात एखाद्या निष्ठावंतावर अन्याय होऊ शकतो. इतर पक्षांतही तीच स्थिती आहे. पण, आम्ही नाराजांची समजूत घालू. पण, पक्षाला बळकटी आणताना काहींना मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल. पक्ष बळकट झाल्यानंतर अशा कार्यकर्त्यांचाही विचार प्राधान्याने होईल. 

प्रश्‍न- सत्तेसाठी तुम्ही राजकीय कोलांटउड्या घेतल्या असा आरोप होतोय? 

उपसा सिंचन योजना रद्द करणार व 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी कामे झालेल्या योजना बंद करण्याबाबत कॉंग्रेसकडून हालचाली सुरू होत्या. तसे झाले तर जिल्ह्यावर मोठा अन्याय झाला असता. त्यामुळे या प्रश्‍नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनतर जिल्ह्याच्या पाणी प्रश्‍नावरच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यात कसलाही स्वार्थ नव्हता. कॉंग्रेसचा संभाव्य निर्णय हाणून पाडण्यात यशस्वी ठरलो. दीड वर्षात राष्ट्रवादीतील नेत्यांशी फार जुळले नाही. आक्रमक स्वभावात बदल करता आला नाही. माझ्या कामाची पद्धत त्यांना पटली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडलो. 

प्रश्‍न- कोणत्या मुद्यांवर प्रचार करणार? 
पाणीप्रश्‍न सोडवताना जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वत:च्या फायद्याचाच विचार केला. खटाव, माण, कोरेगावच्या काही भागाला डावलले गेले. प्रचारात आम्ही दुष्काळी पाणीप्रश्‍नावर भर देऊ. जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा, राज्यमार्गांकडे झालेले दुर्लक्ष, धरणांची रखडलेली कामे, औद्योगिक वसाहतींची अवस्था आदी मुद्यांवर आम्ही जनतेलाच बोलते करू. जिल्हा परिषदेत झालेला अनागोंदी कारभारही चव्हाट्यावर आणू. पैशापुढे पक्षांची किंमत शून्य आहे. हा पैशाचा बाजार, सदस्यांच्या "खरेदी'वर प्रकाश टाकू. निवडून आलेले भाजपचे सदस्य हे असे काहीही करणार नाहीत. यापुढे जिल्ह्याची नाचक्की होणार नाही, अशी हमी आम्ही मतदारांना देऊ. 

गुदगे बंधूंतील फुटीला कारणे वेगळी 
गेली 15 वर्षे निम्मे गुदगे घराणे माझ्याबरोबर आहे. सचिन गुदगेंनी प्रवेश करण्याआधीच दोन्ही भावांत फाटाफूट झाली होती. थोरल्या भावाचा स्वभाव, धाकट्या भावाला मिळालेली वागणूक व मायणी अर्बन बॅंकेतील कारभार आदी कारणांमुळे ही फूट पडली आहे. मायणी गटातील लढत आमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. आम्ही ही जागा 100 टक्के जिंकू. सचिन गुदगे हे चांगल्या मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास डॉ. येळगावकर यांनी व्यक्त केला.

Web Title: BJP will King maker zp