नगरमध्ये भाजपचा जल्लोष... अन्‌ राष्ट्रवादी गोंधळली 

BJP's excite in Nagar ... nationalists confused
BJP's excite in Nagar ... nationalists confused

नगर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ही बातमी कळताच नगरमधील भाजप कार्यकर्त्यांनी जागोजागी जल्लोष केला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. 

मुंबईमध्ये काल रात्री उशिरापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे नवीन सरकार तयार करण्यासाठीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते. यात अंतिम तोडगा निघाला असल्याचे सर्व पक्षीय नेत्यांनी काल सायंकाळी जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती दर्शविण्यात आली होती. कॉंग्रेस नेत्यांनी तर शिवसेना नेत्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

मात्र, आज सकाळीच पावणे सहा वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांनी राजभवनावर शपथ घेतली. ही बातमी कळताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना नवीच डाव पुढे आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. 

भाजप कार्यालयात जल्लोष 
माजी खासदार दिलीप गांधी यांचे निवासस्थानासमोर, आगरकरमळा, सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, धर्माधिकारी मळा, गांधी मैदान येथील भाजप कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. भाजप कार्यालयात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, गोकूळ काळे, कालिंदी केसकर, नरेश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्रीरामपूरत जल्लोष 
भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ही बातमी समजताच श्रीरामपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी चौका-चौकात जल्लोष केला आणि फटाक्‍यांची आतषबाजी केली. 

"मी पुन्हा येईन!' अभिवचन खरे ठरले : विखे 
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपलाच पसंती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येणार हा आत्मविश्‍वास आम्हाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात मागील पाच वर्षांत केलेल्या कामावर मतदारांनी निवडणुकीत विश्‍वास दाखविला होता. "मी पुन्हा येईन', असे जनतेला त्यांनी जनतेला दिलेले अभिवचन खरे झाले, असल्याची भूमिका ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. 

राज्यातील डायनामिक नेते एकत्र: गांधी 
राज्यातील दोन डायनामिक नेते सत्तास्थापनेसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेचा विश्‍वास आम्ही संपादन केला आहे. जनतेच्या विश्‍वासाला तडा जावू देणार नसल्याची भूमिका माजी खासदार व भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी व्यक्त केली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com