esakal | भाजपच्या अंतर्गत नाराजीने सांगली महापौर निवडीत चुरस
sakal

बोलून बातमी शोधा

BJP's internal displeasure takes new turn in Sangli mayoral election

भाजपचे काही नगरसेवक नाराज असल्याने त्या पक्षात अस्वस्थता आहे; तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा न झाल्याने दोघांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक चुरशीची बनली आहे. 

भाजपच्या अंतर्गत नाराजीने सांगली महापौर निवडीत चुरस

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून धीरज सूर्यवंशी, कॉंग्रेसकडून उत्तम साखळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे काही नगरसेवक नाराज असल्याने त्या पक्षात अस्वस्थता आहे; तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा न झाल्याने दोघांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक चुरशीची बनली आहे. 

महापौरपदासाठी येत्या 23 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीनपर्यंत होती. भाजपने महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांची नावे निश्‍चित केली. मात्र, यावरून पक्षात नाराजी आहे. उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह काही नगरसेवकांनी उघडपणे आपली नाराजी नेत्यांजवळ व्यक्त केली.

काही नगरसेवक काल (ता. 17)पासून गायब झाले आहेत. ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही महापौरपदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा होती. या नाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करीत आहेत. 

कॉंग्रेसकडून महापौरपदासाठी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर आणि उपमहापौरपदासाठी उमेश पाटील यांचे अर्ज दाखल केले; तर राष्ट्रवादीने महापौरपदासाठी गटनेते मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी यांचे अर्ज दाखल केले. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीने स्वाती पारधी आणि सविता मोहिते यांचे अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीने दोन-दोन अर्ज दाखल केल्याने त्यांच्यातही एकमत नाही, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे 23 तारखेपर्यंच्या मुदतीत महापौर निवडीत रुसवे-फुगवे, मनधरणी आणि फोडाफोडीचे रंग पाहायला मिळणार असल्याचे दिसते. 

सदस्य "नॉट रिचेबल' 
सत्ताधारी भाजपचे उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह सुमारे सात ते आठ सदस्य कालपासून "नॉट रिचेबल' आहेत. आज सकाळी भाजप नेत्यांच्या ऑफिसर्स क्‍लबच्या बैठकीला ते हजर नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठवून दिलेल्या पत्रातून महापौर आणि उपमहापौर यांच्या उमेदवारांची नावे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सर्व सदस्यांसमोर जाहीर केली. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत अर्ज दाखल केले. 

महापौरच गैरहजर 
महापौर गीता सुतार यांना मुदतवाढ देण्याचा शब्द देऊनही तो पाळला नसल्याने त्या नाराज आहेत. आमराई क्‍लब येथे बैठकीस त्या उपस्थित होत्या. मात्र, उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास त्या गैरहजर राहिल्या. त्यानंतर त्या महापालिकेत महापौर दालनात उपस्थित होत्या. त्या वेळी आपल्याला अर्ज भरण्यास बोलावले नसल्याचे सांगितले. 

"सकाळ'चा अंदाज खरा 
महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांची नावे निश्‍चित झाल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले होते. भाजपच्या कोअर कमिटीने याच दोघांना उमेदवारी देऊन त्यांचे अर्ज दाखल केल्याने "सकाळ'चा अंदाज खरा ठरला. भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि वाचकांनीही तंतोतंत अंदाज खरा ठरल्याबद्दल कौतुक केले.

संपादन : युवराज यादव

loading image