भाजपच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत 

अतुल वाघ- सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

वाठार स्टेशन - वाठार स्टेशन गटात दोन्ही कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारास जोरदार सुरवात केली आहे. या गटात दोन्ही कॉंग्रेसची ताकद सारखीच असल्याने भाजप उमेदवारामुळे रंगत निर्माण झाली आहे. 

वाठार स्टेशन - वाठार स्टेशन गटात दोन्ही कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारास जोरदार सुरवात केली आहे. या गटात दोन्ही कॉंग्रेसची ताकद सारखीच असल्याने भाजप उमेदवारामुळे रंगत निर्माण झाली आहे. 

या गटात राष्ट्रवादीकडून डॉ. अभय तावरे निवडणूक लढवत आहेत. तावरे हे मूळचे भाडळेचे असले तरी व्यवसायानिमित्त ते वाठार स्टेशन येथे स्थायिक आहेत. त्यामुळे त्यांचा दोन्ही गणांत लोकांशी परिचय आहे. कॉंग्रेसकडून अजित खताळ निवडणूक लढवत आहेत. खताळ हे हिवरेचे सरपंच असून त्यांनी जलयुक्त शिवार व लोकसहभागातून गावात भरीव कामे केली असल्याने त्यांचाही या गटात चांगला बोलबाला असल्याने दोन्ही कॉंग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर होईल. भाजपमधून धनंजय तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या भागात भाजपलाही चांगले वातावरण असल्याने तांबे हे खऱ्या अर्थाने रंगत निर्माण करू शकतील. 

दोन्ही गणांतही चुरस 
या गटात वाठार स्टेशन व किन्हई हे दोन गण असून वाठार स्टेशन गणातून इच्छुक असलेल्या विखळे येथील रुक्‍मिणी अडागळे यांची उमेदवारी राष्ट्रवादीने डावलल्याने त्यांनी कॉंग्रेसमधून उमेदवारी घेत राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगल गंगावणे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेतून बिचुकले येथील पुष्पा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली असून शिवसेनाही निवडणूक प्रचारात आघाडीवर आहे. वाठार स्टेशनप्रमाणेच किन्हई गणात राष्ट्रवादीतून निवृत्ती होळ निवडणूक लढवत असून कॉंग्रेसचे विद्यमान सदस्य तुकाराम वाघ यांनी उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादीने डावललेले अपक्ष उमेदवार अमोल राशिनकर यांना कॉंग्रेसने पुरस्कृत करून त्यांचा कॉंग्रसमध्ये लगेच प्रवेशसुद्धा घेतला. भाजपमधून अमोल भुजबळ हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही प्रचार सुरू केला आहे. 

 

छोटी गावे एकत्र येणार का? 
कॉंग्रेसच्या दोन्ही गणांतील कमी मतदान असलेल्या गावातील उमेदवारांची उमेदवारी राष्ट्रवादीने डावलली असल्याने आता छोटी गावे एकत्र येणार का, राष्ट्रवादीचा बलेकिल्ला असलेल्या वाठार स्टेशन येथील भाजपचे उमेदवार धनंजय तांबे हे या गावातील किती मते घेणार, हे येणारी वेळच ठरवणार आहे.

Web Title: BJP's nomination tone of elections