महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात आज काळा दिन; कडकडीत हरताळ

Black Day In Maharashtra Karanatak Border Region
Black Day In Maharashtra Karanatak Border Region

बेळगाव - मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 1) सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येणार आहे. तसेच मूक सायकल फेरीही काढली जाणार आहे. सीमावासियांनी आपले व्यवहार बंद ठेवून हजारोंच्या संख्येने मूक सायकल फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने केले आहे.

फेरीनंतर मराठा मंदिरात होणाऱ्या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ तसेच चंदगडचे आमदार राजेश पाटील उपस्थित राहणार आहेत. मूक फेरी सकाळी 8.30 वाजता धर्मवीर संभाजी मैदानापासून सुरु होणार आहे. 

सीमाभाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ सीमाभागात दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाळला जातो. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शहरातून मूक फेरीही काढून केंद्र सरकारचा निषेधही नोंदविला जातो. काळा पोषाख परिधान करुन मराठी भाषिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतात. गेल्या महिन्याभरापासून मध्यवर्ती म. ए. समितीने काळा दिन फेरीची जागृती केली आहे. गल्लोगल्ली व गावागावात बैठका घेऊन मूक सायकल फेरीत प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षीप्रमाणे आपले व्यवसाय बंद ठेवून फेरीत सहभागी होण्यासाठी मराठी भाषिक सज्ज झाले आहेत. काळे कपडे, काळ्या साड्या, दंडाला काळ्या फिती बांधून फेरीत होण्याची तयारी केली आहे. 

शहर म. ए. समितीसह तालुका म. ए. समिती, युवा समिती, शिवसेना, महिला आघाडी, खानापूर तालुका म. ए. समिती, मराठी युवा मंच यांच्यासह इतर मराठी संघटनांनी स्वतंत्र बैठका घेऊन जनजागृती केली आहे. त्यामुळे, युवा वर्ग आणि महिलाही फेरीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरवेळी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नेते उपस्थित असतात.

शुक्रवारी होणाऱ्या सभेत माजी मंत्री हसन मुश्रीफ व चंदगडचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे, मराठी भाषिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून मूक सायकल फेरी व जाहीर सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन म. ए. समितीने केले आहे. 

सायकल फेरीचा मार्ग 

म. ए. समितीने सायकल फेरी काढण्यासाठी पोलीस खात्याकडे रितसर परवानगीची मागणी केली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने रात्री उशिरा फेरीसाठी तोंडी परवानगी दिली. महाव्दार रोडवरील धर्मवीर संभाजी उद्यानातून फेरीला सकाळी 8.30 वाजता सुरवात होणार आहे. तानाजी गल्ली, रेल्वे फाटक, फुलबाग गल्ली, भांदूर गल्ली, हेमू कलानी चौक, स्टेशन रोड, अंबा भुवन, शिवाजी रोड, रामलिंगखिंड गल्ली, हेमू कलानी चौक, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर, कपिलेश्‍वर उड्डाणपूल, डॉ. एसपीएम रोड, बसवाण गल्ली, होसूर, जुना पीबी रोड, नार्वेकर गल्ली शहापूर, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, खडेबाजार, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, बॅंक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल या मार्गे जाऊन मराठा मंदिरात फेरीची सांगता होणार आहे. त्यानंतर तिथे जाहीर सभा होणार आहे. 

सायकल फेरीसाठी पोलीस आयुक्तांकडे परवानगीसाठी मागणी केली आहे. मागील वर्षीही मागणी केली होती. पण, उशिरा तोंडी परवानगी दिली होती. उद्याही पोलीसांनी परवानगी दिली नाही. तरी सायकल फेरी काढणार आहे. तरी सर्वांनी आपली दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेऊन फेरीत सहभागी व्हावे. महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांनाही फेरीत सहभागी होण्यासाठी संपर्क साधला आहे. नूतन आमदारांनी सभेला उपस्थिती राहाण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
- दीपक दळवी,
अध्यक्ष, मध्यवर्ती म. ए. समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com