मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने दाखविले काळे झेंडे, ताफ्यावर फेकली गाजरं

मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने दाखविले काळे झेंडे, ताफ्यावर फेकली गाजरं

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून विमानतळाकडे निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर गाजरं फेकली. ऐनवेळी ताफ्यात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बाजूला करण्यासाठी पोलिसांची मोठी धांदल उडाली. 

शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली होटगी रोडवर हे आंदोलन झाले. ताफ्यात घुसलेले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सुहास कदम यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांची धांदल उडाली. यावेळी ताफ्याला ब्रेक घ्यावा लागला. कदम यांना पोलिसांनी वेळीच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, युवकचे अध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्याक अध्यक्ष राजू कुरेशी,जावेद खैरदी, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, निशांत सावळे, शाम गांगर्डे, प्रकाश जाधव, प्रमोद भोसले, शत्रुघ्न माने, बालाजी सगलूर, तणवीर गुलजार, शिवराज विभूते, अक्षय शिंदे, अमीर शेख, अरविंद दामजी यांच्यासह लता ढेरे, सिया मुलाणी, सायरा शेख, मार्था आसादे, शोभा गायकवाड, नसीमा शेतसंधी, गौरा कोरे, सविता काटकर, जयश्री पवार, वसीम खान, निलोफर तांबोळी आदी उपस्थित होते. 

हॉटेलचे दरवाजे बंद करून महिलांना रोखले 

मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने जाणार होते, त्या मार्गावरील हॉटेलमध्ये सर्व महिला चहा पित बसल्या होत्या. पोलिसांना याची कुणकूण लागताच महिला दामिनी पथकातील पोलिसांनी हॉटेलच्या दोन्ही दरवाजांना कुलूप ठोकले. पोलिसांनी बळाचा वापर करूनही त्यांना राष्ट्रवादीचे आंदोलन थांबविता आले नाही, आंदोलन यशस्वी झाल्याचे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सुनीता रोटे यांनी सांगितले. 

''सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत यासह सर्वच बाबतीत आरक्षणाचे गाजर दाखवत आहेत. शालेय पुस्तकांच्या माध्यमातून महापुरुषांच्या बदनामीचे षड्यंत्र महाराष्ट्रात सुरू आहे. दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत आहे. इंधनाची दरवाढ दिवसेंदिवस होत आहे. या सरकारवर जनतेचा प्रचंड रोष आहे. प्रातिनिधिक स्वरूपात हा रोष दाखविण्याचे काम आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहे''. 

- संतोष पवार, कार्याध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com