सोलापुरात गुरुजींची विनाब्लेझर गाडी जोरात 

blazer
blazer

सोलापूर : जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ब्लेझरची सक्ती केली होती. त्या सक्तीला खीळ बसली आहे. विनाब्लेझर असलेल्या गुरुजींची गाडी जोरात पुढे सरकली आहे. मात्र, डॉ. राजेंद्र भारुड यांच्या ब्लेझर सक्तीच्या गाडीला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी ब्रेक लावल्याचे गुरुवारी (ता. 22) स्पष्ट झाले. 

मागील जवळपास अडीच महिन्यापासून जिल्ह्याच्या वर्तुळात गुरुजींच्या ड्रेसकोडचा विषय गाजत आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत ऍड. सचिन देशमुख यांनी हा विषय उपस्थित केला. अडीच महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा विषय डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तरी थांबणार का? याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. गुरुजींनी ब्लेझर घालणे कसे सयुक्तिक आहे, हे डॉ. भारुड यांनी अनेकवेळा सांगितले आहे. तर ब्लेझर घालणे शिक्षकांसाठी किती जिकिरीचे आहे हे शिक्षक संघटना समन्वय समितीने निदर्शनास आणून दिले आहे. दिवाळीच्या सुटीपूर्वी शिक्षक संघटना व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीतच अध्यक्ष संजय शिंदे यांनी ब्लेझरची सक्ती नको, अशी ठोस भूमिका घ्यायला हवी होती.

दिवाळीच्या सुटीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी झालेल्या ब्लेझरच्या तपासणीत अनेक शिक्षकांनी ब्लेझरवर बहिष्कार टाकला. तर प्रशासनाने त्या शिक्षकांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी संघटनांनी सोमवारपासून (ता. 26) उपोषण करण्याचा मार्ग स्वीकारला. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने प्रशासन व संघटना यांच्यामध्ये संघर्षाची चिन्हे निर्माण झाली होती. त्यामुळे गुरुवारी अध्यक्षांच्या दालनात पदाधिकारी, प्रशासन व संघटना यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत गुरुजींवर पुढील सर्वसाधारण सभेपर्यंत कारवाई न करण्याचा निर्णय झाला. यापूर्वीच्या बैठकीतच अध्यक्ष शिंदे यांनी ब्लेझरची सक्ती करू नका, असे सांगितले असते तर गुरुवारची बैठक घेण्याची वेळच आली नसती. अध्यक्षांचा मान राखण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल मागे घेत ब्लेझर न घालणाऱ्या शिक्षकांवर कारवाई न करण्यास सहमती दिली. या प्रकारात बरेच राजकारणही झाले. गुरुजींच्या ब्लेझर विरोधाला पाठिंबा देण्यासाठी चक्क आमदारही पुढे सरसावले होते. एकूणच या प्रकरणात शिक्षक संघटनांपुढे पदाधिकारी व प्रशासनालाही झुकावे लागले हे मात्र निश्‍चित. 

तहात हरले तर लढाईत जिंकले 
ड्रेसकोडच्या संदर्भात झालेल्या बैठकीत ब्लेझर अंगावर ओढवून घेत पदाधिकारी व प्रशासन यांच्यासोबत झालेल्या तहाच्या बैठकीत शिक्षक संघटना हरल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात ब्लेझरवर कारवाई करण्याची तयारी सुरू झाली. त्यावेळी प्रशासनाला एक पाऊल मागे घ्यायला भाग पाडणाऱ्या संघटना प्रत्यक्षातील लढाईत मात्र जिंकल्याचे चित्र सध्यातरी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com