दिवंगत मित्राला अनोख्या उपक्रमातून वाहिली श्रद्धांजली, तरूणांचे काैतूक

सदानंद पाटील  
Wednesday, 1 January 2020

हुपरीतील ‘९४ ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम; मित्राच्या स्मृतींना कृतिशील उजाळा. आदिनाथच्या स्मरणार्थ दरवर्षी रक्‍तदान शिबिर घेऊन गरजवंतांना मोफत रक्‍ताचा पुरवठा केला जातो. गतवर्षी तब्बल १०४२ बॅग्ज रक्‍ताचे संकलन करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

कोल्हापूर : हुपरी येथील ’९४ ग्रुप’ म्हणजेच १९९४ मधील हुपरी इंग्लिश स्कूलच्या दहावी पूर्ण केलेल्या मित्रांचा ग्रुप. या बॅचचे विद्यार्थी हुशार, मनमिळावू म्हणून शिक्षकप्रिय बॅच, अशी त्यांची ओळख. बॅचच्या हुशार, लोभस व मनमिळाऊ विद्यार्थी असलेल्या इंजिनिअर आदिनाथ विजयकुमार पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला.

आदिनाथ यांचा मृत्यू अतिरक्तस्राव व वेळेत उपचार न मिळाल्याने झाला. त्यामुळेच अशी वेळ कुणावर येऊ नये म्हणून आदिनाथच्या मित्रांनी ‘९४ ग्रुप’ची स्थापना केली. या माध्यमातून आदिनाथच्या स्मरणार्थ दरवर्षी रक्‍तदान शिबिर घेऊन गरजवंतांना मोफत रक्‍ताचा पुरवठा केला जातो. गतवर्षी तब्बल १०४२ बॅग्ज रक्‍ताचे संकलन करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

अधिक वाचा - PHOTOS : देशातील सर्वांत वेगळ्या धाटणीची अशी ही पैलवान मशीद...

गरजूंना मोफत वाटप 
‘९४ ग्रुप’ने २०१४-१५ मध्ये पहिले रक्‍तदान शिबिर घेतले. या वेळी केवळ ७० बॅग्ज रक्त जमा झाले. परंतु, आदिनाथ यांचे पुण्यस्मरण, नेटके नियोजन व समाजाचा सहयोग यातून या शिबिराचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच ३ जानेवारीला २०१९ ला झालेल्या शिबिरात १०४२ बॅग्ज रक्त जमा झाले. या शिबिरात जे रक्‍त संकलित झाले, त्याचा मोफत पुरवठा हजारो गरजू रुग्णांना केला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटलांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे हुपरी येथे हुपरी इंग्लिश स्कूल. सध्या या शाळेचे शांतारामकृष्ण दातार हायस्कूल, हुपरी असे नामकरण केले आहे. शाळेची १९९४ मधील दहावीची बॅच तशी फारच शिक्षकप्रिय. टेक्‍निकलची ही बॅच अभ्यासात तर अग्रेसर होतीच मात्र कला व क्रीडा क्षेत्रातही अजिंक्‍य होती. या ग्रुपमधील सदस्यांनी सरकारी अधिकारी, डॉक्‍टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील आदी क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.याच बॅचचा विद्यार्थी आदिनाथ इंजिनिअर बनले. ३ जानेवारी २०१२ ला मित्रांच्या कानावर धक्‍कादायक वार्ता धडकली. ग्रुपमधील सर्वांचा लाडका आदिनाथ याचा अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने ग्रुपच्या सदस्य हादरले. आदिनाथचा मृत्यू अतिरक्‍तस्त्राव व वेळेत उपचार न मिळाल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच या मित्राच्या स्मरणार्थ भरीव, ठोस व दिशादर्शक उपक्रम राबवण्याचा संकल्प या मित्रांनी केला. यासाठी ‘९४ ग्रुप’ची स्थापना केली. या ग्रुपने आदिनाथच्या स्मृतिदिनी रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प केला.

अधिक वाचा - तब्बल १० हजारांवर महिला बनविणार कापडी पिशव्या...

शुक्रवारी रक्‍तदान शिबिर

शुक्रवारी (ता. ३) हुपरीतील येथील श्री जिव्हेशर भवन रक्‍तदान शिबिर होणार आहे. यावर्षी ग्रुपने रक्‍तदानासह देहदान व अवयवदानाची मोहीमदेखील हाती घेतली आहे. ग्रुपने आदिनाथच्या स्मृतींना विविध उपक्रमातून तेवत ठेवण्याचे काम केले आहे. ग्रुपने आयोजित रक्‍तदान शिबिरासह विविध उपक्रमात उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रुपचे सदस्य व जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी सचिन शिरदवाडे यांनी केले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blood donation activities on friend Remembrance Day in hupari kolhapur