दोन्ही भावांचा कालव्यात पडून मृत्यू  

आनंद गायकवाड
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

आश्वी : शेतातून दुचाकीवरुन घराकडे परतताना चिखलात दुचाकी घसरुन प्रवरा उजव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडल्याने, राहुल दत्तात्रेय वर्पे ( वय 32 ) रा. ओझर बुद्रूक या शेतकरी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना, संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक शिवारात आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली.

आश्वी : शेतातून दुचाकीवरुन घराकडे परतताना चिखलात दुचाकी घसरुन प्रवरा उजव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडल्याने, राहुल दत्तात्रेय वर्पे ( वय 32 ) रा. ओझर बुद्रूक या शेतकरी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना, संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक शिवारात आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास राहुल वर्पे ओझर बुद्रूक शिवारातील वस्तीवरुन जुन्या गावठ्यातील शेताकडे गेला होता. तेथून कालव्याच्या भरावाच्या रस्त्याने पुन्हा घराकडे परत येत होता. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने त्याची दुचाकी घसरुन प्रवरा उजव्या कालव्याच्या पडला. कालव्यातील पाणी 300 क्यूसेक्स वेगाने वाहत होते. घटनास्थळाजवळ एका विहीरीवर काम करणाऱ्या दोन मजुरांनी ही घटना पाहिली परंतु त्यांना पोहता येत नसल्याने, त्यांनी गावाकडे पळत येवून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्याच्या कडेला त्याची दुचाकी पडलेली होती, मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत होता. त्यामुळे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयातून कालव्याचे पाणी कमी करण्याची सुचना दिल्यानंतर ओझर बंधाऱ्यावरुन कालव्याचे दरवाजे बंद करण्यात आले. 

गावातील अर्जून हळनर, शिवाजी बाचकर, विकास सानप, यशवंत सानप, अजय शेळके, विजय खेमनर, राजेंद्र हळनर या युवकांनी शोध घेतला असता, दुपारी बाराच्या सुमारास घटनास्थळाजवळ सुमारे 50 फुटांवर त्याचा मृतदेह आढळला. पोलिस पाटील सुभाष खेमनर यांनी दिलेल्या खबरीवरुन आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. राहुल यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ असा परिवार असून, याच ठिकाणी आठ वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या भावाचाही कालव्यात पडल्याने मृत्यू झाला होता. या दुर्दैवी साधर्म्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Both brothers die in the canal