सोलापूर महापालिकेत बाऊंसर्सची नियुक्ती

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 11 एप्रिल 2018

सुरक्षेच्या नावाखाली अचानकपणे मुख्य प्रवेशद्धार बंद करण्यात आले, काही दिवसानंतर वाहनांनाही बंदी घालण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी
करण्यापूर्वी किमान दोन ते तीन दिवस नागरिकांना कल्पना देणे आवश्यक होते. मात्र आपण काहीतरी वेगळे करत आहोत हे दाखविण्याच्या नादात 
प्रशासनाकडून दबंगगिरी सुरु झाली आहे.

सोलापूर - सुरक्षेच्या नावाखाली महापालिकेत बाऊंसर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची सोलापूरकर नेटीझन्सनी खिल्ली उडविण्यास सुरवात केली आहे. महापालिका म्हणजे पब किंवा डान्सबार नाही, असा शालजोडाही नेटीझन्सने लगावला आहे. 

पोलिस विभागाने दिलेल्या सुचनेनुसार सुरक्षा व्यवस्था करण्यास कोणाचा विरोध नाही. मात्र त्याचा अतिरेक होत असल्याचे दिसून येत आहे.
सुरक्षेच्या नावाखाली अचानकपणे मुख्य प्रवेशद्धार बंद करण्यात आले, काही दिवसानंतर वाहनांनाही बंदी घालण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी
करण्यापूर्वी किमान दोन ते तीन दिवस नागरिकांना कल्पना देणे आवश्यक होते. मात्र आपण काहीतरी वेगळे करत आहोत हे दाखविण्याच्या नादात 
प्रशासनाकडून दबंगगिरी सुरु झाली आहे. महापालिकेच्या आवारात वाहने लावण्यास प्रतिबंध केल्यामुळे स्मृती मंदिरच्या वाहनतळावर ट्रॅफिक जाम होत आहे. महापालिकेत येणाऱ्यांना रस्त्यावरच वाहने लावावी लागत आहे. कर्मचाऱयांसाठी वेगळी व्यवस्था केली असे म्हटले जात असले तरी आजही निम्म्याहून अधिक कर्मचारी स्मृती मंदिरमध्येच वाहने लावतात. 

प्रवेशद्वार बंद, वाहनांना बंदी हे कमी होते म्हणून की काय आता सुरक्षा रक्षकाबरोबरच महापालिकेत आता बाऊंसरही नियुक्त करण्यात आले आहेत. एकीकडे दहा महिन्यांच्या थकीत पगारासाठी परिवहन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यांच्या पगाराला पैसे नाही म्हणायचे आणि इकडे सुरक्षा रक्षक आणि बाऊंसरवर लाखो रुपये खर्च करायचे असा प्रकार सुरु आहे. प्रशासनाकडून खुलेआम गरज नसलेल्याची अंमलबजावणी होत असताना पदाधिकारी व नगरसेवक मात्र बोलायला तयार नाहीत. बुधवारी सकाळी एका सुरक्षा रक्षकाने बसपच्या नगरसेविकेचे वाहन सोडण्यास नकार दिला. नगरसेविका असल्याचे सांगितल्यावरही पास दाखवा म्हणून मागे लागला. त्यावेळी जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्याने त्या नगरसेविका आहेत असे सांगितल्यावर बसपच्या हत्तीला प्रवेश मिळाला. सोलापूरचे वैभव असलेल्या इंद्रभुवन इमारतीवर आर अो प्लान्ट बसवून इमारतीचे विद्रुपीकरण केले. त्या संदर्भात शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर वगळता इतर कुणीही वक्तव्य केले नाही. अधिकाऱ्यांसाठी आर अो ची व्यवस्था
करून शहरवासियांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनानेच दाखवून दिल्याचा घरचा आहेर त्यांनी दिला आहे. 

सोशल मिडीयावरील काही बोलक्या प्रतिक्रिया...
- भ्रष्टाचार करण्याची ही नवीन पद्धत आहे असे वाटते
- हुकुमशाही राजवटीचा अनुभव येत आहे
- काही बाऊंसरच नगरसेवक झाले आहेत, त्याचे काय
- गरीबांच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे
- बाऊंसरच्या नावाखाली जनतेने तोंड झाकून बुक्क्याचा मार सहन करायचा काय
- जनतेच्या पैशावर बाऊंसरची मजा मारू देणार नाही
- बाऊंसर ठेवले आहेत, तर तेथील पोलिस यंत्रणा कशासाठी आहे

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Bouncers have been appointed in Solapur Municipal Corporation