बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार; गुरुवारी परीक्षा मंडळावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 January 2020

तालुकास्तरावर निवेदन देणार 
बारावी बोर्ड परीक्षेचे कामकाज करणार नाही, अशा आशयाचे निवेदन सर्व तालुका स्तरावर देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले जाणार आहे. यावेळी बोर्डाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. 
प्रा. अमरसिंह खांडेकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती.

सोलापूर ः कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानास पात्र केले आहे. मात्र, अद्यापही त्यांना अनुदान दिलेले नाही. त्यामुळे राज्यभरातील प्राध्यापकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्या असंतोषामुळे प्राध्यापकांनी बारावीच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षा मंडळावर 23 जानेवारीला मोर्चा काढला जाणार आहे. त्याचबरोबर 27 जानेवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

हेही वाचा ः झालं आता आला तोही उखाणा 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विनाअनुदानित शिक्षक गेल्या 18 वर्षापासून विनावेतन काम करीत आहेत. त्यांच्या अनुदान पात्र याद्या घोषित होऊनही अनुदान दिले नाही. 146 कनिष्ठ महाविद्यालये 2018 मध्ये अनुदानास पात्र म्हणून घोषित झाली आहेत. 2019 मध्ये एक हजार 638 कनिष्ठ महाविद्यालय पात्र होऊनही अद्याप त्यांना अनुदान मिळाले नाही. 

हेही वाचा ः कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी; तरुण शेतकऱ्याची आत्महत्या 

विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने पावसाळी अधिवेशनात 20 टक्के प्रमाणे तरतूद करून एप्रिल 2019 पासून 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा शासन आदेशही निघाला. परंतु, हिवाळी अधिवेशनात शासन बदलल्यामुळे निर्णयाची अंमलबजावणीच झाली नाही. अधिवेशनात तत्कालीन शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येणाऱ्या काही दिवसात तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, अद्यापही पुरवणी बजेटमध्ये त्याचा समवेत झाला नाही. 

हे शेवटचे आंदोलन 
गुरुवारी (ता. 23) होणारे हे शेवटचे आंदोलन ठरणार आहे. कारण विनावेतन काम करताना 18 वर्षे झाली आहेत. 203 आंदोलन पूर्ण झाली. या अधिवेशनात अनुदान दिले नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेचे सचिव श्रीधर सागेल यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott on Class XII exams; March on Examination Board on 23 rd