ढवळीत रस्त्यासाठी कडकडीत बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मिरज - ढवळी (ता. मिरज) येथे ग्रामस्थांनी अखेर शब्द खरा करून दाखवला. मंगळवारी दुपारपर्यंत एव्हीएम मशिनमध्ये एकाही मताची नोंद नव्हती. कर्मचारी मतदारांची वाट पाहत निवांत बसले होते.

मिरज - ढवळी (ता. मिरज) येथे ग्रामस्थांनी अखेर शब्द खरा करून दाखवला. मंगळवारी दुपारपर्यंत एव्हीएम मशिनमध्ये एकाही मताची नोंद नव्हती. कर्मचारी मतदारांची वाट पाहत निवांत बसले होते.

रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ थेट मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. चार महिन्यांपासून प्रशासनाला निरोप दिले होते. मतदानाची वेळ येईपर्यंत प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने अखेर ग्रामस्थांनी मतदानादिवशी आज निर्णय प्रत्यक्षात आणला.

निवडणूक कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.20) प्राथमिक शाळेत येऊन केंद्राची व्यवस्था केली; पण ग्रामस्थांनी आज मतदानाकडे पाठ फिरवली. दुपारी बारा वाजले तरी एकही मत नोंदविले गेले नव्हते.

गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह काही शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मतदानाचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे ते हतबल ठरले. सरपंच अश्‍विनी पाटील यांच्यासह सदस्य ग्रामपंचायतीत बसून होते. परगावी राहणारे काही ग्रामस्थ सकाळी आले. मात्र, बहिष्काराची माहिती नसल्याने व केंद्रावरील सामसूम पाहून त्यांनीही आल्यापावली परत फिरणे पसंत केले. एरवी मतदान सुरू असतानाच उमेदवार हजर होतात. आज मात्र एकाही उमेदवाराने गावात येण्याचे धाडस दाखवले नाही. आठवडाभरात प्रचारासाठीही कोणीही आले नाही.

Web Title: boycott on election in dhawali for road