सांगली महापालिकेवर "ब्रॅंडेड भाजप'चेच नियंत्रण;चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्‍वास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

निवडणूका पंधरा दिवसांच्या आहेत. त्यानंतर विकासासाठी साऱ्यांनी एकत्र यावे, हेच अपेक्षित असते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, जयंत पाटील पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे काही चुकीचे नाही

सांगली ः सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेवर पहिल्यांदा "ब्रॅंडेड भाजप'ची सत्ता आली आणि नागरिकांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवण्याचा आम्ही गेल्या अडीच वर्षात कसोसीने प्रयत्न केला आहे. इथल्या कारभारावर आणि प्रशासनावर भाजपचेच नियंत्रण आहे, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. 

सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन आणि मिरजेतील ट्रिमिक्‍स रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, महापौर गीता सुतार, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, सभापती पांडुरंग कोरे, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी, गटनेते युवराज बावडेकर, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह नगरसेवक प्रमुख उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ""महापालिकेतील आमची सत्ता आल्यानंतर कसोसीने विकासाचा प्रयत्न सुरु आहे. आज घंटागाड्यांपासून रस्त्यांपर्यंत महत्वाची कामे मार्गी लागत आहेत. कुपवाडचे ड्रेनेज, शिवाजी क्रीडांगणाचा विकास, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशी कित्येक वर्षे रखडलेली कामे पूर्ण होत आहेत. मनपा जिंका आम्ही 100 कोटी रुपये देतो, असे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. ते त्यांनी दिले आणि त्यातून अनेक कामे पूर्ण झाली. आम्ही विश्‍वासाने अपेक्षापुर्ती करत आहोत.'' 

 

महापौर गीता सुतार यांनी जयंत पाटील यांना "डोक्‍यावर हात असू द्या', असे आवाहन केले होते, जयंतरावांनी त्यावर "इनामदार, देशपांडे यांच्यावर माझे प्रेम आहे', असे सांगत त्यांच्या उपस्थितीत महापालिकेत येऊ, अशी ग्वाही दिली होती. त्यावर इनामदारांनी जयंतरावांसाठी आवतन दिले. या साऱ्याचा अर्थ पुन्हा बीजेपीची वाटचाल जेजीपीकडे चालली आहे का, या प्रश्‍नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ""निवडणूका पंधरा दिवसांच्या आहेत. त्यानंतर विकासासाठी साऱ्यांनी एकत्र यावे, हेच अपेक्षित असते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, जयंत पाटील पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे काही चुकीचे नाही.'' 

 

ते म्हणाले, ""महापालिकेवर भाजपचेच नियंत्रण आहे. तेथे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे पूर्ण लक्ष आहे आणि त्यांच्या कारभारावर आमचे लक्ष आहे. आता राज्यात जे सरकार असेल त्यांच्याशी संवाद साधणे हे अधिकाऱ्यांना गरजेचे असते. त्यामुळे आमचे नियत्रण नाही, असे म्हणता येणार नाही. अर्थात, आम्ही गाफिल नाही. सावध आहोत. महापौर निवड होईल तेंव्हा पाहूच, आमचा प्रत्येक नगरसेवक म्हणतोय, शंका घ्या, पण माझ्यावर नको. मी ठाम आहे.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Branded BJP" controls Sangli Municipal Corporation; Chandrakant Patil expressed confidence