शेट्टी-महाडिक समझोता एक्‍स्प्रेसला ब्रेक

शेट्टी-महाडिक समझोता एक्‍स्प्रेसला ब्रेक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. स्वाभिमानीच्या स्थापनेपासून महाडिक यांनी कधी पडद्यामागून, तर कधी उघड, आवश्‍यकतेनुसार स्वाभिमानीची पाठराखण केली. तसेच शेट्टींनीही विधानसभा निवडणूक असो की लोकसभा, अगदी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतही महाडिकांच्या मदतीची परतफेड केली. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या दूध आंदोलनानंतर महाडिक-शेट्टी यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांतील वितुष्ट दोघांनाही अडचणीचे ठरणार आहे, असे दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील चित्र आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात महादेवराव महाडिक हे एक अजब रसायन आहे. कधी, कोणाला, कुठे अडवायचे, कसे जिरवायचे, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि गोळी कोणाला घालायची, याचे पक्‍के राजकीय गणित महाडिक यांच्याकडे असते. यातूनच त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला आहे. साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी निर्माण झालेल्या स्वाभिमानी संघटनेला त्यांनी पाठबळ दिले. महाडिक हे शेट्टींसोबत असल्याने या दोघांचाही दबदबा निर्माण झाला. संघटनेच्या आंदोलनांच्या माध्यमातून शेट्टी यांनी राजकीय प्रवास सुरू केला. जिल्हा परिषदेपासून ते लोकसभेपर्यंत त्यांनी धडक मारली. शेट्टींच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मतदारसंघातील सहाही मतदारसंघांत महाडिक यांचे मोठे नेटवर्क आहे. वाळवा-शिराळा तर महाडिक कुटुंबांचा मतदारसंघ असल्याने शेट्टींना त्याचा फायदा झाला.

स्वाभिमानीनेही धनंजय महाडिक यांना लोकसभेसाठी, तर अमल महाडिक यांना विधानसभेसाठी मदतीचा हात दिला. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतही महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांचा स्वाभिमानीने प्रचार केला असताना शिरोळमध्ये मात्र महाडिक समर्थकांनी स्वाभिमानीच्या सावकार मादनाईक यांना मदत न केल्याचा आरोप होत आहे.

दरम्यानच्या काळात भाजपमधून बाहेर पडलेल्या शेट्टी यांनी भाजपविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले. स्वाभिमानीचे दूध दर आंदोलन सुरू असताना महादेवराव महाडिक व संघटनेचे भगवान काटे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यातूनच संघटनेचे कार्यकर्ते दुखावले. पुढे जाऊन स्वाभिमानीतून शिवाजी माने बाहेर पडले. त्यांनी वेगळी संघटना काढली. त्यांनाही महाडिक यांनीच बळ दिल्याचा आरोप संघटनेकडून होत आहे. यातूनच महाडिक-स्वाभिमानी यांच्या एकीत बेकी निर्माण झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी व काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक हे पुन्हा एकदा रिंगणात असले तरी स्वाभिमानीने मात्र महाडिक यांच्याविषयीची भूमिका जाहीर केलेली नाही. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार शेट्टी यांनाही भाजप-सेनेकडून तगडे आव्हान निर्माण झाले आहे. या सर्व बदलत्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा शेट्टी-महाडिक यांच्यात समझोता एक्‍सप्रेस धावणार का? याकडे दोन्ही लोकसभा मतदारसंघांचे लक्ष लागले आहे.

शेट्टींच्या पराभवासाठी प्रयत्न होणार
गेली १५ वर्षे स्वाभिमानीने काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात संघर्ष केला. रस्त्यावरची आंदोलने, कार्यकर्त्यांना हाणामारी यापासून गोळीबारापर्यंत सर्व प्रकार झाले. त्यामुळेच मागील लोकसभा निवडणुकीत संघटनेने भाजपशी समझोता केला. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी न होणे, या कारणास्तव संघटनेने भाजपशी काडीमोड घेतली. यानंतर भाजप व पंतप्रधानांविरोधात शेट्टी यांनी देशभर प्रचार केला. परिणामी, भाजपकडून शेट्टींच्या पराभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आघाडी व युतीशी समान अंतरावरच राहण्याच्या सूचना संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com