ब्रेकिंग न्यूज ः अहमदनगरमध्ये सात दरोडेखोर पकडले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

ईश्‍वर भोसले त्याच्या मुलांसह कोठे तरी दरोडा घालण्यासाठी नगर-सोलापूर रोडने नगरकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.

नगर : अहमदनगर सोलापूर रस्त्यावरील वाळुंज शिवारात गायकवाड फार्मजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून सात जणांना पकडले. अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेला. पकडलेल्या आरोपींकडून दोन दुचाकींसह दोन लाख 74 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अटल ऊर्फ अतुल ऊर्फ योगेश ईश्‍वर भोसले (वय 23), सोन्या ऊर्फ लाल्या ऊर्फ राजेंद्र ईश्‍वर भोसले (वय 25), पल्या ऊर्फ जमाल ईश्‍वर भोसले (वय 20), ईश्‍वर गणा भोसले (वय 52), मटक ऊर्फ नवनाथ ईश्‍वर भोसले (वय 19), संदीप ईश्‍वर भोसले (वय 22, रा. बेलगाव, ता. कर्जत), जितेंद्र संसार भोसले (वय 30, रा. रुईनालकोल, ता. आष्टी. जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

ईश्‍वर भोसले त्याच्या मुलांसह कोठे तरी दरोडा घालण्यासाठी नगर-सोलापूर रोडने नगरकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाळुंज शिवारात गायकवाड फार्मजवळ सापळा लावला. काल पहाटे नगरकडे येणाऱ्या दुचाकींना बॅटरीच्या उजेडात थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी दुचाकी न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.

अंधाराचा फायदा घेऊन नाज्या नेहऱ्या काळे पळून गेला. पोलिसांनी त्यांच्याकडून एक तलवार, दोन कटावण्या, एक सुरा, कटर, मिरची पूड, दुचाकी असा एकूण दोन लाख 74 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध पोलिस नाईक सुनील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, मोहन गाजरे, पोलिस नाईक दत्ता हिंगडे, फकीर शेख, संदीप घोडके, सुनील चव्हाण, अण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, दिनेश मोरे यांच्या पथकाने केली. 
 
आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे 
आरोपी ईश्‍वर गणा भोसले याच्या टोळीविरुद्ध कर्जत, आष्टी, जामखेड, पाथर्डी, अंमळनेर आदी पोलिस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, रस्तालूट असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News Seven robbers caught in Ahmednagar