ब्रेकिंग ः नगरमध्ये सापडले आणखी दोन कोरोनाबाधित, दोघेही आहेत परदेशातील

ब्रेकिंग ः नगरमध्ये सापडले आणखी दोन कोरोनाबाधित, दोघेही आहेत परदेशातील

नगर - नगरचा एक रूग्ण कोरोना मुक्त झालेला असताना दुपारी आणखी दोघे कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. मात्र ते दोघेही परदेशी नागरिक आहेत. एक व्यक्ती फ्रान्सचा तर दुसरी आयव्हरी कोस्टचा आहे. त्यांच्याशी संबंधित 09 व्यक्तींनाही घेतले ताब्यात आहे. त्यांचे  स्त्राव चाचणीसाठी पाठवले आहेत. पुण्याला त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

दरम्यान, दुबईहून एक मार्च रोजी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने गेले 15 दिवस या आजाराशी दोन हात करीत अखेर त्यावर मात केली. आज या रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून "डिस्चार्ज' मिळाला. त्यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला आहे. हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात रुग्णास निरोप दिला. "दादा हो, प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा,' असे आवाहन या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने केले आहे. 
जिल्ह्यात पहिल्यांदा शहरातील या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. हा रुग्ण दुबईहून परतला होता. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 12 मार्च रोजी तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. त्यानंतर 14 दिवसांनी पुन्हा तपासणी केली असता, अहवाल "निगेटिव्ह' आला. त्यानंतर लगेच 15व्या दिवशी केलेल्या तपासणीचा दुसरा अहवालही "निगेटिव्ह' आल्याने, तो कोरोनामुक्त झाल्याचे काल (शनिवारी) स्पष्ट झाले. 
आज सकाळी डॉक्‍टरांनी पुन्हा त्याची तपासणी करून सकाळी सव्वाअकरा वाजता त्याला "डिस्चार्ज' दिला. "जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य उपचारांमुळे मी पूर्ण बरा झालो,' अशी भावना रुग्णाने व्यक्त केली. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे आदी या वेळी उपस्थित होते. 
 

मंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक 
कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णावर उपचार करणारा बूथ हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. 

नगरकरांनो, कोरोनाचा धोका ओळखा. सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळा. आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकला, ही अतिशय दिलासादायक बाब आहे. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com