
दृष्टिक्षेपात बालकांचे आरोग्य
कोल्हापूर - नवजात बालकांसाठी स्तनपान अत्यावश्यक असून त्यामुळेच होणाऱ्या बाळाची शारीरिक व मानसिक वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होते. योग्य पद्धतीने स्तनपान झाले नसल्यास मुलांत गुन्हेगारी वृत्ती बळावू शकते, असेही काही संशोधनातून नुकतेच पुढे आले आहे. एकूणच भविष्यात सुदृढ पिढी घडविण्यासाठी प्रत्येक मातेने स्तनपानावर भर दिलाच पाहिजे, असे स्पष्ट मत छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर सरवदे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक यांनी व्यक्त केले.
बालदिनाच्या पूर्वसंध्येला ‘कॉफी वुईथ सकाळ’ या उपक्रमात त्यांनी संवाद साधला. डॉ. सरवदे म्हणाले, ‘‘हजारामागे आठ मुलांना जन्मजात हृदयाचे काही विकार असतात. पण, अलीकडच्या काळात निदानाचे प्रमाण वाढल्याने बालकांत हृदयरोग वाढल्याची चर्चा होते. भीती व्यक्त केली जाते. मात्र, हे विकार जसे वय वाढत जाईल, तसे कमी होतात. अगदी एक किंवा दोन टक्के मुलांवरच शस्त्रक्रिया करावी लागते. शालेय आरोग्य तपासणीतून विद्यार्थ्यांत लठ्ठपणा वाढल्याचे निदर्शनास आले असून विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांत ते प्रमाण अधिक आहे. मुलांना मर्दानी खेळांकडे प्रवृत्त करणे, मोबाईल- टीव्हीपासून शक्य तितके लांब ठेवून संतुलित आहार देणे महत्त्वाचे आहे.’’
मुलांत नैराश्याचे प्रमाणही वाढत असून पालकांतील परस्पर विसंवाद, त्यातून घडणारे घटस्फोट असोत किंवा मुलांशी पालकांचा नसलेला संवाद हीच प्रमुख कारणे आहेत. जिल्हा रुग्णालयातही अशा अनेक केसेस येतात; पण समुपदेशन हाच त्यावरचा मुख्य उपचार असल्याचे त्यांनी सांगितले.
लसीकरण अतिशय महत्त्वाचे
‘‘कोणत्याही बालकाला सुरवातीचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे असते. ते आईच्या गरोदरपणापासूनच सुरू होते. नवजात अर्भकाला काही तासांच्या आत किमान पाच लसी दिल्या जातात. अंगणवाडी, शाळेतूनही लसीकरण होते. त्याचे दुष्परिणाम काहीच नसतात. एखाद्या वेळी काही विपरीत परिणाम जाणवलेच तर तत्काळ मोफत उपचाराची संदर्भ सेवा शासनाने शासकीय रुग्णालयात उपलब्ध केली आहे.’’
- डॉ. हर्षदा वेदक
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ४२ आरोग्य पथके कार्यरत असून सव्वा लाखांवर मुलांची आरोग्य तपासणी ही पथके करतात. या तपासणीतून लठ्ठपणा वाढत असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, पंधरा-सोळा वर्षांच्या मुलांमध्येही आता फिटनेसचा संस्कार रुजत असून ते चांगले लक्षण आहे. मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी केवळ आईनेच नव्हे, तर वडिलांनीही तितकेच योगदान दिले पाहिजे, असेही डाॅ. वेदक यांनी सांगितले.
मोफत लसीकरण
शासकीय लसीकरणात अतिमहत्त्वाच्या लस मोफत दिल्या जातात. भविष्यात मुलांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी या लसी उपयुक्त ठरतात. त्यामुळे या लसीकरणाचे महत्त्व ओळखून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शासकीय रुग्णालयात लसीकरण करणे गरजेचे आहे, असेही डॉ. वेदक यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात बालकांचे आरोग्य