बाबूंची खाबुगिरी जोमातच... 

बाबूंची खाबुगिरी जोमातच... 

सातारा - वर्षानुवर्ष लाचखोरीच्या कारवाया होत असल्या, तरी आर्थिक कमाईची सरकारी बाबूंची हाव कमी होत नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायातून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २९ कारवायांमध्ये ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातही सर्वाधिक कारवाया महसूल विभागात झाल्या आहेत. त्यामुळे लाचेची कीड कधी नष्ट होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांची शासकीय नोकरांकडून आर्थिक लोभापायी अडवणूक, पिळवणूक होऊ नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करत असते. वर्षानुवर्षे या विभागाकडून कारवाया होत आहेत. त्यामध्ये काही गुन्ह्यांमध्ये शिक्षाही लागल्या आहेत, तरीही आर्थिक कमाईची हाव कमी होताना दिसत नाही. २०१८ मध्येही २०१७ प्रमाणेच २९ कारवाया झाल्या. त्यामध्ये ३७ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे कारवायांचा सरकारी कर्मचाऱ्यांवर काही फरक पडतो का नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. लाचेची कारवाई झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचे संपूर्ण आयुष्य उद्‌ध्वस्त होते, तरीही पैशांचा मोह सूटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात झालेल्या कारवायांमध्ये नेहमीप्रमाणेच महसूल विभागाने खाबूगिरीतील वरचे स्थान पटकावले आहे. त्यानंतर पोलिस विभागाचा नंबर आहे. त्याचबरोबर ग्रामविभागबरोबर विधी व न्याय खातेही लाचखोऱ्याच्या विळख्यातून सुटले नसल्याचे चित्र गेल्या वर्षातील कारवायातून समोर येत आहे. 

विभागवार कारवाया :
महसूल विभाग :- १३
पोलिस विभाग :- ७
ग्रामविकास खाते :- ४
विधि व न्याय खाते :- २
शिक्षण खाते :- १
वीज खाते :- १
अन्न व औषध प्रशासन :- १

अडवणूक हा गुन्हा
कोणत्याही आर्थिक आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com