लाच मागितली... डायल करा १०६४

लाच मागितली... डायल करा १०६४

कोल्हापूर - सलग तीन दिवस तीन कारवाईत लाच घेताना एक पोलिस, एक तलाठी व दोन अधीक्षक यामुळे कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची हॅट्‌ट्रिक केली आहे. याशिवाय दोन वर्षांपूर्वी लाच घेताना सापडलेला एक आरटीओ निरीक्षक व त्याचे पैसे गोळा करणारा एक पंटर या दोघांना आजच तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा धडाका थोडा फार तरी प्रमाणात जाणवू लागला आहे. विशेष हे, की १०६४ या लाचलुचपत विभागाच्या फोन नंबरचा फार परिणामकारक उपयोग होत आहे. लोक तक्रारी करण्यास, माहिती पुरवण्यास पुढे येत आहेत.

१०६४ हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा फोन आहे. तो २४ तास चालू असतो व त्यावरून कोणीही घेणाऱ्याची माहिती देऊ शकतो. गुपचूप तक्रार करू शकतो. हे लोकात पोहचवण्यासाठी या विभागाने दोन-तीन वर्षे खूप परिणामकारक प्रयत्न केले. जेथे सार्वजनिक कार्यक्रम असतील तेथे प्रवेशद्वारावर थांबून लाचलुचपत विरोधात जनजागृतीची पत्रके वाटली. व्हिजिटिंग कार्ड दिली. प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या मुख्य कक्षातच १०६४ हा फोन क्रमांक व लाच घेणाऱ्यांची माहिती या फोनवर कळवा, असे ठळक फलक लिहिले. या विभागामार्फत दीपावलीच्या शुभेच्छा लोकांना दिल्या. त्या निमित्ताने हा फोन नंबर लोकांच्या मनावर ठसला गेला. जसा १०० क्रमांक म्हणजे लाच घेण्याच्या विरोधातील नंबर हे ठळकपणे मांडले गेले. 

त्याचा परिणाम असा झाला की वर्षभरात ३४ कारवाई करून लाच घेताना पकडले. यावर्षी तर तीन महिन्यांत १० जण पकडले गेले. याचा अर्थ सरकारी कार्यालयातील लाच घेणे हा प्रकार पूर्ण बंद झाला असा नाही; पण तक्रार केली तर कारवाई होऊ शकते, याची खात्री नागरिकांना झाली. यापूर्वी आपण लाच घेणाऱ्या विरोधात तक्रार केली तर आपल्याला त्रास होईल का? अशी भीती नागरिकांना होती; पण तक्रार करणाऱ्याला त्रास होऊ शकत नाही. त्याचे काम अडवले जात नाही. हा विश्‍वास लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने दिला आहे. 

विभागाची टीम अशी 
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम पुणे विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीष गोडे, एम. के. पाटील, प्रवीण पाटील, मनोहर खणगावकर, शाम बुचडे, अमर भोसले, मौहन सौंदत्ती, मनोज खोत, शरद पोरे, संग्राम पाटील, रूपेश माने, कृष्णा पाटील, नवनाथ कदम व छाया पाटोळे पाहतात.

लाच घ्यायची राहू दे; पण लाच मागितली तरी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. लोकांनी त्यांच्या कामाबाबत एखादा लाच मागत असेल किंवा अन्य काहीही अपेक्षा व्यक्त करत असेल तर त्याचे बोलणे व्यवस्थित रेकॉर्ड करावे. कामासाठी चहा मागितला तरी तो गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात.
- गिरीष गोडे,
पोलिस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com