साडेतीन लाखांची लाच मागितल्याने अभियंता जाळ्यात

Tukaram-Mangal-Ashok-kamble
Tukaram-Mangal-Ashok-kamble

कोल्हापूर / शिरोळ - नळ पाणीपुरवठा योजनेचे मूल्यांकन करून मोजमाप पुस्तिका तयार करून देण्यासाठी साडेतीन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी आज शिरोळ पंचायत समितीचा शाखा अभियंता तुकाराम शंकर मंगल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. आज दुपारी शिरोळ पंचायत समिती कार्यालयात कारवाई झाली; तर तत्कालीन उपअभियंता अशोक कांबळे यास या प्रकरणी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. 

बसवंत अडकुरकर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या बांधकाम व्यावसायिक असलेल्या मित्राने ग्रामपंचायत टाकवडे (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणीपुरवठा योजनेचे तीन कोटी ८० लाखांच्या कामाचा ठेका घेतला होता. मात्र, त्यांना हे काम वेळेत करता न आल्याने त्यांनी करारपत्राद्वारे हे काम अडकुरकर यांना दिले होते. मार्चमध्ये त्यांनी काम पूर्ण केले. या काळात तीन कोटी ५५ लाखांची सात बिले त्यांना मिळाली होती.

अडकुरकर यांनी उर्वरित २५ लाखांचे बिल मिळण्यासाठी शिरोळ पंचायत समितीकडील पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता तुकाराम मंगल याची भेट घेऊन तत्कालीन उपअभियंता अशोक कांबळे याच्याकडून केलेल्या कामाचे मूल्यांकन करून मोजमाप पुस्तिका (एमबी) तयार करून देण्याची विनंती केली होती. मात्र, मंगल टाळाटाळ करीत होता. २४ मेस टाकवडे येथे पुन्हा याबाबत विनंती केली. या वेळी मंगल याने काम करून देण्यासाठी स्वतःकरिता दोन लाख व उपअभियंता कांबळे याच्याकरिता दीड लाख अशी साडेतीन लाखांची मागणी केली. याबाबत अडकुरकर यांनी २६ मेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तुकाराम मंगल व अशोक कांबळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली. यात कामाचे मूल्यांकन करून मोजमाप पुस्तिका तयार करून देण्यासाठी दोघांनी एकत्रितपणे साडेतीन लाखांची मागणी केल्याचे, तसेच काम होण्याआधी स्वतःसाठी एक लाख व उपभियंता कांबळेसाठी ५० हजारांची मागणी केल्याचे व उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर मागितल्याचे निष्पन्न झाले. उपअभियंता कांबळेकडे याबाबत पडताळणी केली असता त्याने आतापर्यंत मंजूर केलेली बिले व अखेरच्या मूल्यांकनासाठी तडजोड करून एक लाख ६० हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, झालेल्या कामांची बिले मिळाली नसल्याने अडकुरकर यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा कांबळे याने तेवढ्या रकमेचा धनादेश देण्याची मागणी केली. अडकुरकर यांनी धनादेश दिल्यानंतर उपअभियंता कांबळे याने मूल्यांकन व एम.बी.वर २१ मार्च ही जुनी तारीख टाकली. मंगल यांनेही आधीच्या तारखा टाकून दिल्या. 

काम झाल्याने लाचलुचपत विभागाने २२ जूनला जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागात कांबळे, तसेच १६ जुलैला शिरोळ पंचायत समिती कार्यालयात मंगल यास ५० हजार रुपये देण्यासाठी सापळा रचला. मात्र, कारवाईची कुणकुण लागल्याने दोघांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. अखेर आज शाखा अभियंता तुकाराम मंगल यास लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली; तर उपअभियंता अशोक कांबळे यास पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.

जॅकवेलचा समावेश न करताच अंदाजपत्रक
मंगल याने कोंडिग्रे, जैनापूर, तमदलगे येथील अंदाजपत्रक बनविताना त्यात इंटकवेल धरले आहे. मात्र जॅकवेल धरले नाही. यामुळे योजनेचे काम करण्यात अडचण निर्माण झाली आहे. योजना सुरू करावयाची असल्यास जॅकवेलची गरज आहे. केवळ जागेवर न जाता, कोल्हापूरमध्ये बसून अंदाजपत्रक केले, असा आरोप मंगल याच्यावर ठेकेदार बाचू बंडगर यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com