वीटभट्टी उद्योगांवर महामंदी; यंदा घात वर्षच

जयसिंग कुंभार
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री - व्यावसायिकांची स्थिती; बुडत्याचा पाय खोलातच

उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री - व्यावसायिकांची स्थिती; बुडत्याचा पाय खोलातच

सांगली - गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णाकाठचे मोठे अर्थकारण पेलणारा वीटभट्टी उद्योग यंदा महामंदीच्या गर्तेत सापडला आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये भट्ट्या सुरू होण्याआधीच्या या काळात विटेला उच्चांकी दर मिळत असताना यंदा उत्पादन खर्चातही प्रतिहजारी दोनशे रुपये कमी दराने वीट विक्री सुरू आहे. नोटांबदीच्या निर्णयानंतर तर संपूर्ण बांधकाम व्यवसायच ठप्प झाला आहे. त्यातच फ्लाय ॲश आणि सिमेंटच्या विटांनी पारंपरिक मातीच्या विटांसमोर आव्हान उभे केले आहे. सध्याचे विटांचे दर आणि उत्पादन खर्च पाहता वीटभट्टी व्यावसायिकांची अवस्था बुडत्याचा पाय खोलातच अशी स्थिती झाली आहे.

डिसेंबर ते मे या सहा महिन्यांतच वीटभट्टी व्यवसाय होत असतो. गेल्या काही वर्षांत उत्पादन खर्च वाढत असताना विटेचे दर मात्र घटलेच आहेत. गतवर्षी याच महिन्यात ४२०० ते ४५०० रुपये प्रतिहजारी असणारा दर आता ३४०० रुपयांवर घसरला आहे, तरीही विटेला उठाव नाही. वीटभट्ट्या सुरू करण्यासाठी व्यावसायिकांना या महिन्यात मोठी अार्थिक तरतूद करावी लागते. त्याच वेळी दर कोसळल्याने पडेल त्या दरात वीट विक्रीची वेळ त्यांच्यावर आली आहे. यामागे नोटाबंदीचा निर्णय असल्याचे दिसते.

बांधकाम व्यवसायावर या निर्णयाचा मोठा परिणाम झाला आहे. त्याचे थेट परिणाम वीट व्यवसायावर झाले आहेत. गेल्या काही वर्षांत फ्लाय ॲश आणि सिमेंट विटांचा वापर वाढला असल्याने बाजारपेठेत मातीच्या विटांच्या मागणीतही घट झाली आहे. वीटभट्टी उद्योजकांमध्ये व्यावसायिक दृष्टीचा खूप मोठा अभाव आहे. व्यवसायाला होणारा पतपुरवठा प्रामुख्याने भरमसाट व्याज दरांच्या भिशींच्या माध्यमातूनच होतो. बिल्डर्सही या व्यावसायिकतेच्या असह्यतेचा फायदा घेत असतात. त्यातून निर्माण झालेल्या दुष्टचक्रात उद्योजक अडकले आहेत. अनेकांना शेतजमिनी विकून वीट व्यवसायातून हद्दपार होण्याची वेळ आली आहे. 
व्यवसायातील जाणत्या उद्योजकांच्या मते पुढील सहा महिने विट उद्योगासाठी अभूतपूर्व अशा टंचाईचे असतील. मालाला उठाव नाही. दर कोसळलेले अशीच स्थिती राहिल्याने उद्योजकांना हंगाम पूर्ण करताना नाकीनऊ येतील अशी स्थिती आहे. सहा महिन्यांचे उत्पादन समोर ठेवून गुंतवणूक केली असल्याने यंदाचे विटभट्टीचे गणीत पुरते कोलमडलेले असेल असा त्यांचा दावा आहे. त्यातून शेतकऱ्यांप्रमाणे विटभट्टीमालकांवरही गळफास घ्यायची वेळ येऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षीची प्रतिहजार वीट उत्पादन रुपयात खर्च ३५९३ रुपये, त्याचा तपशील असा -

माती- ५३० (एक गुंठा माती उत्खननासाठी सव्वादोन लाख रुपये. त्यातून सव्वाचार लाख वीट तयार होते.)
जागा भाडे-१७० (२८ लाख उत्पादनासाठी ३ एक जागा लागते. प्रति गुंठा चार हजारप्रमाणे भाडे)
बगॅस-३२५ (प्रतिटन अडीच हजार, एका गाडीत ९ टन त्यात ७० हजार माल तयार होतो)
कोळसा २०५ (एक लाख वीट भाजण्यासाठी अडीच टन कोळसा लागतो. प्रतिटन ८ हजार २०० रुपये दर)
गोवा चुरी राख- ४५० (दहा टन गाडीत ८० हजार वीट तयार होते, याप्रमाणे काढलेला दर)
कसवा (वाळू)- ६५ (एक गाडीत एक लाख माल याप्रमाणे)
वीट थापईचा खर्च- ६००, भटकर (भट्टी रचण्याची मजुरी)-१५०, कच्ची वीट वाहतूक-१७०, माती वाहतूक-१६०, डेपोला माती वाहतूक-११०, डेपोची माती उकरणे-२५, वीटभट्टी परवाना खर्च-८० (यात अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाचेचाही समावेश आहे.) दिवाणजी, वरकामासाठी गडी-७०, प्रत्यक्ष साइटचा लेव्हलिंगसह खर्च-३२, जाळीची राख-१०, सहा महिन्यांच्या भांडवलाचे व्याज-१५०, टॅक्‍टर रोटर-४०, डिझेल इंजिन-१०, वीज-३०, पावसाच्या काळात प्लास्टिक कागद खर्च-२०

गेल्या वर्षीचा विटेचा उत्पादन खर्च प्रतिहजारी ३५९३ रुपये आहे. सध्या विक्री मात्र ३४०० रुपयांप्रमाणे होते आहे. यंदा पुन्हा बगॅसच्या दरात गाडीमागे पाच हजारांची वाढ झाली आहे. यंदाचे ऊस उत्पादन पाहता ही वाढ येत्या दोन महिन्यांत दुप्पट होईल. त्यामुळे आगामी वर्षात विटेचा उत्पादन खर्चात आणखी शंभर-दीडशे रुपयांची वाढच होईल. त्याच वेळी विटेला उठाव मात्र असणार नाही. त्यामुळे यंदाचे वर्ष वीटभट्टीमालकांसाठी घात वर्ष असेल.
- युवराज बोंद्रे, वीटभट्टी व्यावसायिक 

Web Title: bricks industries of the Depression