तारळ्यात "बीएसएनएल' ची सेवा महिन्यानंतर सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

 ग्राहकांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास; लॅंडलाइन, मोबाईलधारकांत समाधान.

तारळे : महिन्यापासून येथील "बीएसएनएल'चा बट्ट्याबोळ झाला होता. "बीएसएनएल'चे नेटवर्क गायब झाल्याने मोबाईलसह दूरध्वनी सेवा खंडित होऊन "बीएसएनएल' चे ग्राहक संपर्काबाहेर गेले होते. ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा खंडित तसेच मोबाईल बंद राहिल्यामुळे शासकीय कार्यालयांतील कामे रखडली होती, तर ग्राहक हवालदिल झाले होते. "सकाळ'ने यावर प्रकाश टाकला होता. अखेर महिन्यानंतर सेवा सुरू झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 
 

"महावितरण'ने वीज कनेक्‍शन तोडल्यामुळे "बीएसएनएल"चे टॉवर बंद पडले होते. परिणामी त्या-त्या ठिकाणची "बीएसएनएल' सेवा खंडित झाली होती. खंडित झालेली ही सेवा अनेक दिवस तशीच राहिल्याने ग्राहक हवालदिल झाले होते. शासकीय कार्यालयांतील ब्रॉडबॅंड बंद राहिल्याने कामे खोळंबली होती. दूरध्वनी ही अत्यावश्‍यक सेवा असतानाही त्याचे कसलेही सोयरसुतक अधिकाऱ्यांना नसल्याचेच दिसून आले. आज सुरू होईल, उद्या सुरू होईल, असे म्हणत अखेर महिन्यानंतर सेवा सुरू झाली अन्‌ मोबाईलधारकांचा जीव भांड्यात पडला. विशेषतः टपाल कार्यालय ठप्प होते. त्याचे व्यवहार सुरळीत झाल्याने ग्राहकांबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.
 

वरिष्ठ पातळीवर वीज पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात अनेक बैठका आणि पाठपुरावा सुरू होता. मात्र, खासगी कंपन्यांच्या तुलनेमध्ये "बीएसएनएल'चा महसूल कमी असल्याने वीज बिले भरण्यासाठी अडचणी येत होत्या. अखेर वरिष्ठ पातळीवरून वीज पुरवठा पूर्ववत केल्याने "बीएसएनएल' ची सेवा पूर्वपदावर आली.
 

दरम्यानच्या काळात ग्राहकांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच महिना, तीन महिन्यांचे रिचार्ज मारलेल्यांचे आर्थिक नुकसानही झाले. अनेकांनी आपली सिमकार्ड इतर कंपन्यांत पोर्ट करून त्रासातून सुटका करून घेतली. याचा फटका पुन्हा "बीएसएनएल'च्या महसुलालाच बसणार आहे. खंडित सेवा टाळून दर्जेदार सेवा तसेच थ्रीजी, फोरजी सेवा देण्याचे आव्हान "बीएसएनएल' समोर असणार आहे.
 

दीर्घकाळ खंडित नेटवर्कची पुनरावृत्ती नको 

"बीएसएनएल'ला आतासारखी दीर्घकाळ खंडित झालेल्या नेटवर्कची पुनरावृत्ती टाळावी लागेल. स्पर्धेच्या युगात इतर खासगी कंपन्यांच्याबरोबर सेवा द्यावी. अन्यथा जे काही ग्राहक उरले आहेत, तेही राहणार नाहीत. नाहीतर "कनेक्‍टिंग इंडिया' असे घोषवाक्‍य असणाऱ्या "बीएसएनएल'चे "डिसक्‍नेक्‍टिंग इंडिया' व्हायला वेळ लागणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL's service continues in tarale after month