मॉस्कोतील म्युझियममध्ये कोल्हापूरच्या शिल्पकाराचे बुद्धाचे शिल्प

मॉस्कोतील म्युझियममध्ये कोल्हापूरच्या शिल्पकाराचे  बुद्धाचे शिल्प

कोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा अवलिया माहीर आहे. त्याच्या शिल्पकलेचा बोलबाला राज्याबरोबरच परदेशातही झाला आहे.

श्री. घारगे मूळचे मजले (ता. हातकणंगले) येथील आहेत. ते कोल्हापुरातील पाचगावमध्येच स्थायिक आहेत. त्यांचे शिक्षण जी. डी. आर्ट (शिल्पकला) व एमएफएस (पेंटिंग) झाले. त्यांनी २००२ मध्ये व्यावसायिक शिल्पकलेत प्रवेश केला. रायगडावरील वीरासनातील छत्रपती शिवरायांचा पुतळा त्यांनीच बनविला आहे. पुतळ्याचे काम करताना धगधगत्या भट्टीसमोर त्यांनी अहोरात्र काम केले. छत्रपती शिवरायांचा आकर्षक, भारदस्त व तेजस्वी पुतळा त्यांच्या अथक परिश्रमामुळे तयार झाला आणि तो मोठ्या दिमाखाने रायगडावरील मेघडंबरीत विराजमान झाला.

छत्रपती शिवाजी महाराज, चिदंबर स्वामी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळे यांनी तयार केले आहेत. विशेष म्हणजे, त्यांची बुद्धांची विशिष्ट भावमुद्रेतील शिल्पे फारच प्रसिद्ध आहेत. ही शिल्पे भारतात विविध ठिकाणी विक्री झाली आहेत. त्याचबरोबर त्यांचा प्रवास थेट मॉस्कोपर्यंत झाला आहे.

पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, बंगळूर येथे त्यांनी प्रदर्शन भरवून लोकांची वाहवा मिळवली. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, नेहरू सेंटर (मुंबई), कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या प्रदर्शनातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांनी संभाजी महाराज, राजाराम महाराज, पहिले शाहू यांच्या मुद्राही तयार केल्या आहेत. 

अस्सल मराठा पद्धतीची कर्नाटकी धोप तलवार खूपच प्रसिद्ध झाली होती. या तलवारीच्या प्रतिकृतीला ठिकठिकाणांहून मागणी होती. घारगे यांनी या तलवारीची तयार केलेली प्रतिकृती अनेकांना खूप आवडली. सुमारे २५० प्रतिकृती त्यांनी तयार केल्या. पाचगावमधील त्यांच्या घराच्या परिसरातच फाउंड्री व स्टुडिओ असून, तेथे पाच लोक काम करतात.  

अर्धाकृती पुतळा तयार करायचा झाल्यास पाच ते सहा महिने, तर अश्वारूढ पुतळा करायचा असेल तर साधारणपणे वर्ष लागते. पुतळा बनविण्याचे काम आव्हानात्मक असते. भट्टीसमोर उभे राहणे ही मोठी कसरत आहे. पण, त्या कामातून मिळणारा आनंदही मोठा असतो. युरोपमध्ये शिल्पप्रदर्शन भरविण्याचा प्रस्ताव आला असून, त्याची तयारी सुरू आहे.
- सतीश वसंतराव घारगे
(शिल्पकार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com