महापालिका सभेवर 'बुलेट'ची नजर

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

महापालिकेच्या सभागृहात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर आता 'बुलेट कॅमेऱ्यां'ची नजर असणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. 

सोलापूर- महापालिकेच्या सभागृहात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर आता 'बुलेट कॅमेऱ्यां'ची नजर असणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. 

सध्या सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र त्यांची क्षमता कमी आहे. त्यातच महापौरांच्या डायसमागे बसविलेला कॅमेरा वारंवार नादुरुस्त होत होता. त्यामुळे सभागृहातील कामकाजाचे व्यवस्थित चित्रण होण्यात अडचणी येत होत्या. ही बाब संगणक विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या ठिकाणाहून कॅमेराच काढून टाकण्यात आला. कॅमेरा असला तरी त्याला ऑडिओची जोड नव्हती, त्यामुळे केवळ चित्रीकरणावरच समाधान मानावे लागत होते. 

सभागृहात वाचलेल्या सूचना-उपसूचना काय आहेत याची खात्री करता यावी यासाठी या कॅमेऱ्यांचा उपयोग अपेक्षित आहे. मात्र ऑडिओ बंद असल्याने सभागृहनेते व विरोधी पक्षनेत्याने काय सूचना-उपसूचना वाचल्या, कोणी कुणावर काय आरोप केले, त्यांना उत्तर काय दिले याची माहितीच होत नव्हती. आता या बुलेट कॅमेऱ्यांमुळे प्रत्येक क्षण आणि संवाद चित्रित होणार आहे.

गेल्या वर्षी एका विषयाप्रकरणी, सूचना बदलल्याचे वाचन झालेले फुटेजच गायब झाले होते. नव्याने बसविण्यात येणाऱ्या बुलेट कॅमेऱ्यांमुळे असे प्रकार होणार नाहीत याची खात्री करावी लागणार आहे, अन्यथा कितीही बेकायदेशीरपणे कामकाज झाले तरी त्याचे योग्य चित्रण झाले नाही, तर या कॅमेऱ्यांचाही काही उपयोग होणार नाही. 

ध्वनियंत्रणाही बदलण्याची गरज 
सभागृहात बसविण्यात आलेली ध्वनियंत्रणाही आता जुनाट झाली आहे. मोक्‍याच्या वेळी ध्वनिक्षेपक बंद पडण्याचे प्रकार होतात. त्यामुळे मग 'जाणीवपूर्वक आवाज दाबला' अशा आरोपांना अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कॅमेऱ्याबरोबरच ध्वनियंत्रणाही बदलल्यास अडचणी येणार नाहीत, असे जाणकारांचे मत आहे.

Web Title: Bullet camera at municipal council in solapur