महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आया-बहिणींची काळजी नाही का 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 10 मे 2018

सोलापूर - बस बंद असल्याने आम्हाला रिक्षातून अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागत आहे. तसेच एकाच रिक्षात दहा-दहा जणांना बसविले जाते. नाईलाजाने पुरुषांच्या गर्दीतही जावे लागते. त्यामुळे रिक्षातून प्रवास करणे आमच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. महापालिकेत पंख्याखाली बसणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सोलापुरातील आया-बहिणींची काळजी नाही का, असा संतप्त प्रश्‍न गोदूताई वसाहतीमधील महिलांनी आज केला. 

परिवहनचा संप महिनाभर झाले सुरू आहे. त्यामुळे गोदूताई वसाहतीमधील नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी सोईची असणारी बससेवा बंद आहे. येथील महिलांना कामासाठी किंवा विडी कामगारांना विडीचे माप देण्यासाठी शहरात यावे लागते. बस बंद असल्याने महिलांची मोठी अडचण होत आहे. संपाबाबत तोडगा काढावा आणि बस सुरू करावी, अशी मागणी करीत विडी घरकुलमधील शेकडो महिलांनी आज सभागृह नेते संजय कोळी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन दिले. माकपच्या नगरसेविका कामिनी आडम याही उपस्थित होत्या. 

अनेक महिलांनी रिक्षातून प्रवास करताना येणारे अनुभव सांगितले. तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना तर केवळ नाईलाज म्हणून रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. वेळेत पोचायचे असते, अशा वेळी रिक्षात पुरुषांची गर्दी असेल तर महिलांच्या मांडीवर बसून प्रवास करावा लागतो. मांडीवर बसण्यास विरोध केला तर त्या महिलेस रिक्षातून उतरविले जाते, असे अनुभव येथे आलेल्या महिलांनी सांगितले. रिक्षातून दिवसा प्रवास करणे इतके जिकरीचे आहे तर रात्रीच्या वेळी प्रवास करणे अतिशय धोकादायक आहे, असा मुद्दाही काही महिलांनी उपस्थित केला. 

परिवहन उपक्रमाचा संप मिटावा ही माझीही भूमिका आहे. मीही गरीब घरातूनच आलो आहे. महिन्याचा पगार नसेल तर काय अवस्था होते याची जाणीव आहे. 10 महिन्यांचा पगार नसलेल्यांची काय अडचण होत असेल? पालकमंत्री व महापौरांशी बोलून कायम तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊ. 
- संजय कोळी, सभागृह नेता 
 
गोदूताई वसाहतीसाठी असलेली बससेवा बंद असल्याने येथील महिलांची कुचंबणा होत आहे. या वसाहतीमधून परिवहनला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे परिवहनचा संप मिटवून बससेवा त्वरित सुरू करावी. 
- कामिनी आडम, नगरसेविका

Web Title: bus strike women agitation municipal officer