स्वरक्षणासाठी नेते, उद्योगपतींकडे रिव्हॉल्व्हर! 

परशुराम कोकणे 
बुधवार, 3 एप्रिल 2019

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शहर आणि जिल्ह्यातील परवाना असलेली शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. शहरात शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे, महेश कोठे, राष्ट्रवादीचे नेते महेश गादेकर, रिपाइंचे नेते राजाभाऊ सरवदे, उद्योगपती दत्ता सुरवसे यांच्यासह 427 जणांकडील शस्त्रे पोलिस ठाण्यांकडे जमा करण्यात आली आहेत. 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शहर आणि जिल्ह्यातील परवाना असलेली शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. शहरात शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे, महेश कोठे, राष्ट्रवादीचे नेते महेश गादेकर, रिपाइंचे नेते राजाभाऊ सरवदे, उद्योगपती दत्ता सुरवसे यांच्यासह 427 जणांकडील शस्त्रे पोलिस ठाण्यांकडे जमा करण्यात आली आहेत. 

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 512 जणांकडे परवाना असलेली शस्त्रे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 427 जणांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. यातून 83 जणांना सूट देण्यात आली आहे. सूट दिलेल्या परवानाधारकांमध्ये बॅंकेच्या सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. तसेच यात काही बाहेरगावी असलेल्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. यात 12 बोरची बंदूक आणि रिव्हॉल्व्हरचा समावेश आहे. नियमाप्रमाणे सर्वच राजकीय नेते, कार्यकर्त्यांकडील शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. पोलिसांनी सर्व शस्त्रे परवानाधारकांना नोटीस देऊन 28 मार्चपर्यंत जमा करून घेतली आहेत. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे कळविण्यात आली आहे. 

निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शहरात शस्त्रे जमा करून घेतली जातात. पोलिस ठाण्यात शस्त्र जमा केल्यानंतर त्याची पावती संबंधितांना दिली जाते. मतमोजणीनंतर ही शस्त्रे परत दिली जाणार आहेत. सोलापूर शहरात शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, नागनाथ पाटील, उद्योगपती दत्तात्रय सुरवसे, दत्तात्रय तानवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, चंद्रकांत वानकर, रिपाइंचे नेते राजा सरवदे, उद्योगपती दत्ता सुरवसे यांच्यासह अनेक राजकीय नेते, कार्यकर्त्यांकडे स्वरक्षणासाठी शस्त्रे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार 512 पैकी 427 शस्त्रे जमा करून घेतली आहेत. नियमाप्रमाणे बॅंकांच्या सुरक्षारक्षकांना यातून सूट देण्यात आली आहे. 
- बाळासाहेब भालचिम, 
पोलिस निरीक्षक, विशेष शाखा

Web Title: businessman politicians keeps revolver for self defense