कारभारणीला घेऊन संगे लढतो आहे, फक्त लढ म्हणा... 

Call for help to the Tambe family of Yedemachhindra
Call for help to the Tambe family of Yedemachhindra

नवेखेड  (सांगली)  : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवि, नाटककार कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांची कविता आहे 
"कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे 
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे... 
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, 
पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा...' 
या कवितेतील ओळींप्रमाणेच एका जिद्दीची कहाणी लिहिली जात आहे. 
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) या गावात.

शेतमजुरी करणाऱ्या व अठराविश्व दारिद्रयाचे चटके सोसत तीन अंध अपत्यांना घेऊन एक दांपत्य सततचे धक्के खात, कोसळून पडणारं घर सावरत संसाराचा गाडा ओढत आहेत. सदाशिव व लक्ष्मीबाई तांबे या दांपत्याची ही गोष्ट. घराचा निवारा आणि संसाराचा गाडा अनेकवेळा उघड्यावर पडूनही पुन्हा तो सावरण्याचे काम करीत आहे. 

स्वातंत्र्यलढ्यात प्रतिसरकारची निर्मिती करून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचं 
येडेमच्छिंद्र हे गाव. याच गावातील सदाशिव व लक्ष्मीबाई तांबे यांची ही चित्तरकथा. 

पंचवीस वर्षांपूर्वी अथणी तालुक्‍यातून हे दांपत्य या भागात पोटासाठी आले. कुडामेढीचे छप्पर घालून त्यांनी संसार थाटला. भविष्याची स्वप्ने रंगवली. नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांच्या संसारवेलीवर प्राजक्ता हे पहिले फूल उमलले. तांबे दांपत्याला आनंद झाला. उमेदीने ते काम करू लागले. पुढे आणखी तीन मुली व एका मुलाची भर पडली. दोन मुली व एक मुलगा पूर्णपणे अंध आहेत. हे बघून दांपत्याला जीवन अंधःकारमय वाटू लागले. सुरवातीला कोणाच्या मदतीशिवाय मुले काहीच करू शकत नव्हती.

त्याही स्थितीत त्यांनी परिस्थितीचा सामना करायचा ठरवले. मिरजेच्या अंध मुलांच्या शाळेत मुलांना दाखल केले. चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमित शाळेत शाळेतून मुलांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. 
संगीता (वय 22) पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिकतेय. दुसरी सावित्री (वय 20) मिरजेच्या कन्या महाविद्यालयात शिकतेय. तर मुलगा मल्हारी (वय 12) सहावीत शिकतोय. 

त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करून व प्रपंचाचा गाडा ओढताना तांबे दांपत्याची ससेहोलपट सुरू आहे. एकीकडे ही लढाई सुरू असताना नियतीने मात्र त्यांच्यावर वक्रदृष्टी कायम केली आहे. कुडामेढीचे छप्पर शेजारी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे पेटले. अंध मुले घरी होती. त्यांना काही दिसत नसल्याने अडचण झाली. आगीची धग जाणवू लागली. त्यांनी कसातरी जीव वाचवला. सदाशिव तांबे यांनी काही लोकांचे देणे भागवण्यासाठी उधार-उसनवार करून 60 हजार रुपये जमवले होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कुटुंब रस्त्यावर आले. प्रपंच उघड्यावर पडला. दुसरीकडे जागा बघत बाजूला पत्रे उभा करीत प्रपंच पुन्हा उभाण्याचे काम सुरू आहे. त्यांना मदतीची गरज आहे. या मुलांची दप्तरे शैक्षणिक साहित्य आगीत जळून खाक झालीत. कुटुंबाला सावरण्यासाठी तालुक्‍यातील दिव्यांग बांधव पुढे सरसावलेत. त्यांच्या हाताला बळ देण्याची गरज आहे. 

गावात कायमस्वरूपी जागा मिळावी

यावर्षी मी पदवीच्या शेवटच्या वर्षात जाईन. नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. कुटुंबाला गावात कायमस्वरूपी जागा मिळावी. गावकऱ्यांनी मदत करावी.
- संगीता तांबे, येडेमच्छिंद्र 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com