खुल्या नाट्यगृहातील सभागृहात पुरग्रस्तांसाठी छावणी

help to flood survivors.jpg
help to flood survivors.jpg

इस्लामपूर : कृष्णा आणि वारणेच्या महापुराबरोबर वाळवा तालुक्यात मदतीचाही महापूर आला आहे. येथील कपील आणि अमित ओसवाल या बंधूंच्या नियोजनबध्द मदतीने पुरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. स्वखर्चाबरोबरच शहरातून येणार्‍या मदतीचेही त्यांनी योग्य नियोजन केले. शहरातील पुरबाधीतांसाठीची एक छावणी दत्तक घेत अमित ओसवाल यांनी छावणीतील व्यवस्थापन हाताळले आहे. तर कपील ओसवाल हे पुरग्रस्त गावातून फिरत लोकांच्या गरजा ओळखून तशी मदत पुरवण्याचे नियोजन करीत आहेत. 

महापुरात कृष्णा आणि वारणेच्या काठावरील सर्वच गावे बाधीत झाली आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. बाधीतांचे भविष्य अंधारात असले तरी आजच्या घडीला तोंड देण्यासाठी समाजातील सर्वच स्तरातून हजारो हात मदतीला धावले आहेत. मुसळधार पाऊस सुरु असताना 5 ऑगस्टला रात्री दोन वाजता अमित ओसवाल यांचा फोन वाजला. बोरगावातून निरोप आला. कृष्णेचे पाणी वाढतय, अनेक वस्त्यांमधील सारी घरं सकाळपर्यंत पाण्यात जातील. माणसं बाहेर काढली पाहिजेत. निरोपाचं गांभीर्य ओळखून अमित ओसवाल यांनी यंत्रणा कामाला लावली. दोन ट्रक बोलवले. बोरगावला धाडले. तोपर्यंत बोरगावात कमरेपर्यंत पाणी आले होते. त्यातून लोकांना बाहेर काढले. ट्रकच्या दोन तीन खेपा करुन शक्य तितक्या लोकांना इस्लामपूरला हलवले. तोपर्यंत खुल्या नाट्यगृहातील सभागृहात लोकांची व्यवस्था करण्यात आली.

त्याच रात्री आचार्‍याला इथुन माणसं जाईपर्यंत त्यांच्या चहा, नाष्टा, जेवणाचं कंत्राट दिलं. दुसर्‍या दिवसापासून सकाळचा चहा, नाष्टा, दोन वेळचं जेवण याची सोय करण्यात आली. जेवणातही अनेकदा श्रीखंड, पुरीचाही बेत होता. या शिवाय लहान मुलांना रोज दुध आणि फळांचीही येथे सोय आहे. पुराची दाहकता वाढेल तशी इस्लामपूरला आश्रयाला येणार्‍यांची संख्या वाढू लागली. खुल्या नाट्यगृहात सुरु झालेल्या छावणीचं पालकत्वच अमित ओसवाल यांनी स्वीकारलं.

गेल्या आठ दिवसांपासून अमीत ओसवाल कुठं भेटतील तर ते खुल्या नाट्यगृहातील छावणीत अशी स्थिती आहे. तिथल्या बाधीतांची खाण्यापिण्यापासून लागलं, खुपलं, आजारपण हे सार अमीत ओसवाल स्वतः जातीनं लक्ष घालून पहात आहेत. एका दिवशी रात्री तीनला छावणीत एका वृध्दाला पक्षाघाताचा झटका आला. तोही निरोप मिळताच अमित ओसवाल यांनी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडूनही या छावणीत मदत येत आहे. त्या मदतीचं काटेकोर नियोजन करुन ती प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी अमीत ओसवाल यांचे पथक सक्रीय आहे. अजून चार दिवस पुरग्रस्त छावणीतच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरही या लोकांच्या घराकडे राहण्याची व्यवस्था न झाल्यास गावातील सार्वजनिक ठिकाणी त्यांना तात्पुरते शेड बांधून देण्याचेही नियोजन या पथकाकडून सुरु आहे.

दुसरीकडे त्यांचे बंधू कपील ओसवाल पुग्रस्त भागात थांबून तेथील बाधीतांच्या गरजा लक्षात घेवून मदतीसाठी सक्रीय आहेत. तिथेही बाहेरुन येणार्‍या मदतीचे नियोजन आणि आवश्यक त्या ठिकाणी स्वखर्चाने मदत अशा दोन्ही आघाड्यांवर ते सक्रीय आहेत. या शिवाय छावणीतून गावात परत जाणार्‍या सुमारे पाचशे कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या जीवनावश्यक कीटचे वाटप करणार आहेत. ओसवाल बंधूंच्या या पथकात गजानन फल्ले, अमोल ठाणेकर, सोमनाथ फल्ले, भाऊ माळी, शितल करांडे, अमोल जौंजाळ, ओंकार फल्ले, गौतम राऊत, बंटी निकम, हेमंत राऊत, सुनिल जांभळे सक्रीय आहेत.

ओसवाल कुटुंबाचे सामाजिक भान 
गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यात अथवा शहरात अनेकांच्या अडीनडीला ओसवाल कुटुंब उभे राहते. तालुक्याला पुराचा वेढा पडल्यानंतर कपील व अमीत ओसवाल हे गेले दहा दिवस रात्रंदिवस सक्रीय आहेत. निसर्गाने पुरग्रस्तांच्यावर बिकट वेळ आणली आहे, आपल्याकडे जे काही आहे त्यातील काही हिस्सा आपण समाजाचे देणे लागतो या भावनेनेच हे कुटुंब मदतीसाठी सक्रीय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com