esakal | "पदवीधर, शिक्षक'ची रणधुमाळी थांबली; आता "मतदार टू मतदार' लक्ष्य 
sakal

बोलून बातमी शोधा

campaign of graduates & teachers constituency has stopped; now the "voter to voter" target

राज्याचे वरिष्ठ सभागृह अर्थात विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी पाच वाजता थांबली.

"पदवीधर, शिक्षक'ची रणधुमाळी थांबली; आता "मतदार टू मतदार' लक्ष्य 

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : राज्याचे वरिष्ठ सभागृह अर्थात विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी पाच वाजता थांबली. प्रत्यक्ष प्रचाराला पूर्णविराम देऊन नेते, कार्यकर्त्यांनी आता "मतदार टू मतदार' लक्ष्य ठेवून काम सुरू केले. दहा-पंधरा दिवसांत पाचही जिल्ह्यात प्रचाराची राळ उठली. राज्यातील बड्या नेत्यांनी त्यात लक्ष घातल्याने रंगत वाढली. मंगळवारी (ता. 1) मतदान होणार आहे. त्यात कोण बाजी मारेल, कुणाचा पतंग कोण काटेल आणि कुणाची उमेदवारी कुणाला डोकेदुखी ठरेल, हे कळेल. 

पुणे पदवीधर मतदार संघात 62 तर शिक्षक मतदार संघात 35 उमेदवार रिंगणात आहेत. काहींनी माघार घेतली नाही, मात्र नंतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व मित्रपक्षांची युती असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मनसे, जनता दल सेक्‍युलर, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, डीपीआय, संभाजी ब्रिगेड, भारताचा कम्युनिष्ट पक्ष यांनी आव्हान दिले आहेत. काही अपक्षांनी ताकद लावली आहे. विविध संस्था, संघटना, विचारधारांच्या जोरावर या आखाड्यात त्यांचा शड्डू घुमला आहे. 

कोरोना संकट काळात ही निवडणूक लांबणीवर पडली होती. ती अचानक जाहीर झाली. त्यामुळे प्रचाराला अतिशय कमी वेळ मिळाला. पाच जिल्हे, त्यात 50 हून अधिक तालुके, चार हजारांहून अधिक गावे, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या सर्व पातळीवर यंत्रणा कामाला लावणे, हे सोपे आव्हान नक्कीच नव्हते. त्यात उमेदवारांची दमछाक झाली. बैठकांवर बैठका झाल्या.
 

यासाठी राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, ऍड. प्रकाश आंबेडकर, बाळा नांदगावकर यांच्यासह बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरली होती. 

सांगली केंद्रस्थानी 
पदवीधरांसाठी व्हिजन, स्वतंत्र महामंडळ, कमी व्याजावर कर्ज, कर्जावर अनुदान, कारखानदार उमेदवार आदी मुद्यांवर प्रचारात रंग भरला. सांगली जिल्ह्यातील मुख्य उमेदवार रिंगणात असल्याने इथे फारच रंग भरला. खरी फाईट सांगलीत असल्याने पुढचे दोन दिवस छुपा प्रचार, मतदार भेटी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी गती येणार आहे. 

संपादन : युवराज यादव