आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे

महेश बारटक्के
Sunday, 8 December 2019

कुडाळ गटाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारसभेत शशिकांत शिंदे बाेलत हाेते. त्यावेळी त्यांनी वेळप्रसंगी भाऊ, मित्र, सहकारी कोणाचीही तमा बाळगणार नाही, असा स्पष्ट अनेकांना सूचक इशाराही दिला.

कुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक पवार यांचा विजय निश्‍चित असून शशिकांत शिंदेंची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. ही लढाई केवळ दीपक पवारांची नसून माझी, किंबहुना राष्ट्रवादी पक्षाची आहे. त्यामुळे दीपक पवारांचा ऐतिहासिक विजय करून शरद पवार यांना वाढदिवसाची भेट द्या, असे भावनिक आवाहन जावलीचे माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी ई - सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  

कुडाळ (ता. जावळी) येथे कुडाळ गटाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शशिकांत शिंदे यांनी विधानसभेच्या पराभवानंतर प्रथमच जावलीत येऊन जाहिररित्या त्यांची व राष्ट्रवादीची भूमिका परखडपणे मांडली.

जरुर वाचा - आता पुढची धाव पुण्यात !

शिंदे म्हणाले, ""दीपक पवारांनी सत्ताधारी पक्षाला व पदाला लाथ मारून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाकडून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे जावलीतील विकासकामांसाठी यानिमित्ताने तगडा नेता लाभणार आहे. मी आजपर्यंत पक्षाच्या भूमिकेशी तडजोड केलेली नाही, यापुढेही करणार नाही. वेळप्रसंगी भाऊ, मित्र, सहकारी कोणाचीही तमा बाळगणार नाही, असा स्पष्ट शब्द देत त्यांनी अनेकांना सूचक इशाराही दिला.

हेही वाचा -  आंबेडकर अनुयायी सुखलोलूप तर नेते दुकानदारीत मश्गूल : आठवले 

विरोधकांकडून माझ्या भूमिकेबाबत शंकेचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. पक्षाच्या विरोधात जर कोणी, काही करत असेल तर त्याच्या विरोधात मला उभं राहावंच लागेल. शरद पवारांनी माझ्या राजकीय वाटचालीसाठी मनापासून ताकद देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे माझा नेता माझे योग्य पुनर्वसन करणारच आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनीही नव्या जोशाने कामाला लागावे.'' 
तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी अजित पवारांशी बोलून जरंडेश्वर कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा देणार आहे. 
अवश्य वाचा - ताई तू घाबरु नकाेस आम्ही आहाेत

यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, जावलीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, कुडाळचे उपसरपंच गणपत कुंभार, सुधीर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत

शशिकांत शिंदे यांनी जावळीत तुफान फटकेबाजी केली. भाषणात बोलताना "देर आए, दुरुस्त आए...' असे सांगत त्यांनी जावळी तालुक्‍यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतची भूमिकाही स्पष्ट करताना त्यांनी आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत, असे सांगितले. त्यांच्या या विधानाची चर्चा मात्र तालुक्‍यात चांगलीच रंगली आहे.

त्यामुळे आगामी काळात तालुक्‍यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा संघर्ष पाहावयास मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसेच या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या उसाचा, कामगारांचा, साखर कारखान्याचा विषय हातात घेऊन तालुक्‍यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत: पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Campaign Rally Was Organized At Kudal Where Shahsikant Shinde Warned Many People And Asked them To Remain With NCP Party