कापूस वेचायला येता का?

सचिन सातपुते
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

कपाशीच्या वेचणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. कापूस वेचणीसाठी प्रतिकिलो 10 रुपये मजुरी देऊनही मजुरांचा शोध घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शेवगाव (नगर) : आधीच अवकाळी पावसाने शेतातील पिके हातची गेली असताना हाताशी आलेल्या कपाशीच्या वेचणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. कापूस वेचणीसाठी प्रतिकिलो 10 रुपये मजुरी देऊनही मजुरांचा शोध घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पिकांवर आतापर्यंत केलेला खर्च, अवकाळी पावसाने केलेले नुकसान आणि आता वेचणीचा खर्च या तिहेरी आर्थिक संकटात शेतकरी भरडून निघाला आहे.

तालुक्‍यात यंदा 42 हजार 106 हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. लागवडीनंतर अत्यल्प पावसाने या पिकावर बियाणे, खते, फवारणी, मशागत यावर केलेला खर्चही वाया जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, उशिरा सुरू झालेल्या परतीच्या पावसाने हाती आलेले थोड्याफार प्रमाणातील पीक पाणी साचून हातातून गेले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशीची बोंडे काळी पडली. फुटलेला कापूस सतत ओला राहून सरकीला मोड आले. पिकात सतत पाणी साचून ते सडून गेले. काही प्रमाणात वेचणीसाठी आलेला कापूस शेतातील चिखलामुळे वेचता येईना, असे अनेक प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.

आता दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने हाताशी आलेला कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. कपाशीचे क्षेत्र जास्त असल्याने वेचणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. कापूस ओला आहे. झाडांची उंची जास्त नाही. त्यामुळे तो बसून वेचावा लागतो. अशा अनेक कारणांमुळे वेचणीसाठी प्रतिकिलोचा दर 10 रुपयांपासून 12 रुपयांपर्यंत गेला आहे. शिवाय मजुरांना जाण्या-येण्यासाठी वाहने देऊनही त्यांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसह सर्व सदस्य वेचणीच्या कामात व्यस्त आहेत. मुलेही या कामात हातभार लावताना दिसत आहेत.

भावही थिजलेला...!

एवढे दिव्य पार करून वेचलेल्या कापसाला बाजारात दोन ते तीन हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे. कापूस ओला आहे, भिजलेला आहे, खराब आहे, अशा सबबीखाली व्यापाऱ्यांकडून कापसाचा भाव ठरवला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत या पिकावर झालेला खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचे आर्थिक गणित जुळेनासे झाले आहे.

"सीसीआय'चे खरेदी केंद्र सुरू करा

व्यापारी वेगवेगळ्या कारणांनी कमी-अधिक दराने कापूस खरेदी करीत आहेत. तेव्हा शासनाने "सीसीआय'मार्फत खरेदी केंद्र सुरू करून कापसाला योग्य हमी भाव मिळवून द्यावा, तरच आतापर्यंत या पिकासाठी केलेला खर्च निघण्याची अपेक्षा आहे.

- गोरक्षनाथ भिसे, शेतकरी, माळेगाव, ता. शेवगाव

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can you collect cotton?