कॅनडा सरकार देणार पंढरपूरच्या विकासासाठी 2 हजार कोटी

अभय जोशी
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पंढरपूर ः भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीपूर्ण संबंधांना दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅनडा सरकार कडून पंढरपूरचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या कामांसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये अत्यल्प व्याज दराने कॅनडा सरकारकडून दिले जाणार आहेत. येत्या 3 ऑक्‍टोबरला कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्ही हे त्यांच्या टिम सह पंढरपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी "सकाळ" शी बोलताना दिली.

आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर कॅनडा सरकारकडून पंढरपूरच्या विकासासाठी निधी दिला जाणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर काल (शुक्रवारी) मुंबईत या संदर्भातील बैठक झाली. याबैठकीला राज्याचे मुख्य अवर सचिव प्रविणसिंह परदेशी, कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्ही, डॉ. अतुल भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पंढरपूरच्या विकासा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पंढरपूरची आरोग्य व स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, सिवेज ट्रिटमेंट प्लॅन्ट, रस्ते, वाहतूक व्यवस्था, वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था यासह पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला या बैठकीत श्री. रिव्ही व त्यांच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी तत्वतः मंजूरी दिली. आता 3 ऑक्‍टोबर ला ते त्यांचे इंजिनिअर्स, आर्किटेक्‍ट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टिमसह पंढरपूरला भेट देणार आहेत.

कॅनडा सरकारची टीम पंढरपूरचा अभ्यास करुन आराखडा तयार करणार आहे. तो आराखडा तयार झाल्यानंतर वारकरी, महाराज मंडळी, स्थानिक नागिरक अशा सर्वांची चर्चा करुन त्यामध्ये आवश्‍यक ते बदल ही केले जाणार आहेत. त्यानंतर सामंजस्य करार केला जाईल व त्यानंतर या कामांना सुरुवात होईल.

पंढरपूरचा चेहरामोहरा बदलून पंढरपूरला स्मार्ट शहर बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कॅनडा सरकारच्या या प्रकल्पामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्र देशात स्मार्ट शहर म्हणून नावारुपाला येईल, असा विश्‍सास डॉ. भोसले यांनी "सकाळ" शी बोलताना व्यक्त केला. या प्रस्तावित प्रकल्पातून होणारी कामे पुढील शंभर ते दोनशे वर्षांचा विचार करुन केली जाणार आहेत. ही कामे करत असताना पंढरपूरला येणारे वारकरी, धार्मिक वातावरण, पंढरपूरचे स्थानिक नागरिक आणि पर्यटक अशा सर्वांचा विचार करुन नियोजन केले जाणार असल्याचे डॉ. भोसले यांनी नमूद केले.

Web Title: The Canadian government has given Rs 2 thousand crore for the development of Pandharpur