जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

कातरखटाव - उरमोडी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बोंबाळे येथील उपकालव्यामध्ये मर्यादेपेक्षा जादा आल्यामुळे ते कालव्याबाहेर पडून सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यात ५० हजार रुपयांचे शेणखत वाहून गेले. काही शेतातील माती वाहून गेली तर बऱ्याच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले.  

कातरखटाव - उरमोडी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बोंबाळे येथील उपकालव्यामध्ये मर्यादेपेक्षा जादा आल्यामुळे ते कालव्याबाहेर पडून सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यात ५० हजार रुपयांचे शेणखत वाहून गेले. काही शेतातील माती वाहून गेली तर बऱ्याच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले.  

उरमोडी कालव्यातून सध्या खटाव व माण या दोन्ही तालुक्‍यांना पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या सात दिवसांपासून वडूज- कातरखटाव मार्गावरील गणेशवाडी परिसरामध्ये पाणी सुरू आहे. गणेशवाडी परिसरातील बंधारे पाण्याने भरून वाहू लागले आहेत. कालपासून कातरखटाव, बोंबाळे, डाळमोडी, रानमळा, निसळबेंद, शिंगाडवाडी परिसरात पाणी सोडलेले आहे. काल रात्री पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. रात्री १२ पासून कालव्याच्या क्षमतेपेक्षा जादा पाणी आल्याने मातोश्री मंगल कार्यालयानजीक असलेल्या उपकालव्यात पाणी मावेनासे झाले. परिणामी पाणी कालव्याच्या बाहेर पडून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरले. त्यामध्ये बोंबाळे येथील कृष्णराव निंबाळकर, राजाराम निंबाळकर, अप्पासाहेब निंबाळकर यांच्या शेतातील तब्बल ५० हजार रुपयांचे शेणखत वाहून गेले. काही शेतातील माती वाहून गेली, तर बऱ्याच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले. कालव्यातून बाहेर पडत असलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या आवाजामुळे परिसरातील लोक जमा झाले. 

अखेर उपकालव्याचे दार केले बंद 
दरम्यान, असाच विसर्ग सुरू राहिल्यास शेतामधील माती वाहून जाईल, या भीतीने सर्वांनी ‘उरमोडी’च्या माण तालुक्‍यात जाणाऱ्या कालव्याकडे धाव घेतली व या उपकालव्याचे दार बंद केले. त्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला. कालव्यात मर्यादेपेक्षा जादा पाणी आल्याने परिसरात चोहीकडे पाणीच पाणी झाले.

Web Title: canal water

टॅग्स