esakal | संभुआप्पा बुवाफन यात्रा रद्द करा; पोलिस पाटील, मठाधिपतींचे निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

Cancel Sambhuappa Buwafan Yatra; Police Patil & mathadhipati asks for

दू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेले येथील ग्रामदैवत श्री संभुआप्पा बुवाफनची यात्रा कार्तिक पौर्णिमाला म्हणजे येत्या 26 नोव्हेंबर रोजी आहे.

संभुआप्पा बुवाफन यात्रा रद्द करा; पोलिस पाटील, मठाधिपतींचे निवेदन

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर : हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेले येथील ग्रामदैवत श्री संभुआप्पा बुवाफनची यात्रा कार्तिक पौर्णिमाला म्हणजे येत्या 26 नोव्हेंबर रोजी आहे. शहर कोरोनाच्या विळख्यातून अजून बाहेर पडलेले नाही. कोरोनाने शहराची जीवित, मानसिक व आर्थिक हानी खूप झाली आहे. याचा गंभीर विचार करून यावर्षीची यात्रा रद्द करावी, अशी मागणी पोलिस पाटील बाळासाहेब पाटील व मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी केली आहे. 

याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षकनारायण देशमुख, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पाटील यांना देण्यात आले आहे. 

याबाबत माहिती देताना पोलिस पाटील म्हणाले,""इस्लामपूरची यात्रा ही हिवाळ्याच्या दिवसांत असते. हिवाळ्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्‍यता आहे. ही यात्रा 15 दिवस चालू असते. या यात्रेत लाखो भाविक आसपासच्या राज्यातून तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा या भागातून येत असतात.

यात्रेत जनावरांचा बाजार, करमणुकीचे खेळ, पाळणे, खेळणी दुकाने, इतर छोटे-मोठे व्यापारी येत असतात. यामुळे यात्रेत लोकांची गर्दी होत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्‍यता आहे. कोरोनाच्या महामारीमुळे संभुआपा बुवाफन यात्रा समितीने मंदिरातील विविध कार्यक्रम रद्द केले आहेत. यामध्ये फकीर होणे, मंडप चढवणे, संदल, पोवाडा, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार नाहीत. 

मठामध्ये प्रवेश दिला जाणार नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मठ पूर्णपणे बंद असणार आहे, तरी भाविकांनी मठाकडे येऊ नये. घरीच नैवेद्य तयार करून घरीच फकीर जेवू घालावे. मठामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. 
- मिलिंद मठकरी, मठाधिपती, संभूआप्पा- बुवाफन देवस्थान 

संपादन : युवराज यादव

loading image